सोलापूर : मागील तीनशे वर्षांपूर्वीपासून भरणारे पेशवेकालीन मंगळवार बाजार हे सोलापूरची ओळख आहे. सोलापूरसह परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व ग्राहक यांच्यासाठी आजही मुख्य बाजार आहेत. शहराच्या हद्दवाढीनंतर नवनवीन नगरे आणि वस्त्यांमध्ये वाढ झाली़ अक्कलकोट रोड एम़ आय. डी. सी. मध्ये यंत्रमागधारक संघाचे कार्यालय ते सुनील नगर रस्त्यावर आता प्रतिमंगळवार बाजार भरू लागला आहे.
या नव्यानेच उदयास आलेल्या बाजारात भाजीपाला, डाळी, मसाल्याचे पदार्थ, फळे, कपडे,धान्य, भांडी, सौंदर्य प्रसाधने अशा सर्वसामान्यांना लागणाºया सर्व वस्तू वाजवी किमतीत विक्रीस आहेत़ जवळपास पाचशे विके्रते या बाजारात असतात़ दर मंगळवारी सायंकाळी चार ते रात्री साडेनऊपर्यंत भरणाºया या बाजारात पंधरा ते वीस हजार ग्राहक विविध वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात.मंगळवारी दुपारी चार वाजता विके्रते आपली दुकाने मांडण्यात व्यस्त असतानाच एम़ आय. डी. सी. तील महिला कामगार हातात पिशव्या घेऊन चालत बाजारात येत होत्या.बाजारात गजबज वाढतच चालली होती. कोणी भाजीपाला तर कोणी कपडे तर कोणी मसाले, लोणची अशा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत संपूर्ण बाजार फुलून गेल्याचे चित्र साडेसहापर्यंत पाहावयास मिळाले.
किरकोळ चार-पाच भाजी विक्रेत्यांनी सुरू झालेल्या या एम़ आय. डी. सी. तील कामगारांसाठी उदयास आलेल्या प्रति मंगळवार बाजाराला दोनच वर्षांत व्यापक स्वरूप प्राप्त झाले़ कामगारांसोबत परिसरातील सुनील नगर, आशा नगर, कलावती नगर, अविनाश नगर, कामगार वसाहत नगर, गणेश नगर, नितीन नगरामधील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे़ येथील नागरिक मोठ्या प्रमाणात कुटुंबासह या आठवडी बाजारात खरेदीसाठी येत असतात़
शेतकºयांना लाभदायक...- दोड्डी, मुळेगाव, कुंभारी, तोगराळी, हणमगाव, गुर्देहळ्ळी, चिंचोळी, कर्देहळ्ळी, श्रिपनहळ्ळी, धोत्री परिसरातील शेतकरी भाजीपाला फळभाज्या येथील बाजारात विक्रीसाठी आपला माल आणतात़ जवळपास साठ टक्के शेतकरी स्वत: आपला माल थेट बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात़ त्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत़ त्यांची संख्या वाढत चालली आहे असे शेतकरी मळसिद्ध माळगे यांनी सांगितले़ या बाजारामुळे शहरात नवीन विके्रते तयार होऊन त्यांना रोजगार मिळाला आहे़
बाजारात मिळतात सर्वच वस्तू ...- भाजीपाला, फळभाज्या, हुलगा, मटकी, चना, मसूर, मटकी, ज्वारी, मूग, मोहरी, कारळ, चवळी, जवस, सर्व डाळी, चप्पल, सौंदर्य प्रसाधने, भांडी, लहान मुलांचे कपडे, कंबर पट्टा, लोणची, पापड, लाडू, जिलेबी मिठाई आदी शहरातील मंगळवार बाजारात मिळणाºया सर्व वस्तू वाजवी किमतीत मिळत असल्याने आठवडाभर लागणाºया सर्व वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत असल्याचे निदर्शनास आले़
स्वस्त दरात भाजीपाला, फळे, धान्य व इतर वस्तू येथील बाजारात उपलब्ध होत असल्याने कामगारांसाठी ते सोयीचे झाले आहे़ शेतकºयांकडून प्रत्यक्ष ग्राहकांनाच भाजी मिळत असल्याने ताजी व स्वस्त, वाजवी दरात मिळते़ त्यामुळे बाजाराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. - शंकर वडनाल, यंत्रमागधारक
सहा ते सात वर्षांपूर्वी मसाल्याचे पदार्थ व डाळी हातगाडीवर मांडून ग्राहकांची वाट पाहत असे. आता दर मंगळवारी मात्र चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे़ मंगळवारी येथील कामगारांचा पगार होत असल्याने ते खरेदीसाठी येतात़ पाचशे लोकांना रोजगार मिळतो़- नागनाथ चिलवेरी, विक्रेते