सोलापूर : कोरोना साथीच्या काळात गरिबांना वाटपासाठी दिलेल्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पोलिसांना धान्याचा मोठा साठा आढळला होता. तपासात कर्नाटकातील टोळीने बार्शीतील दुकानदारांनी बोगस पावत्यांद्वारे हे धान्य विकले असल्याचे निष्पन्न झाले होते. पनवेल पोलिसांच्या अहवालावरून बार्शीतील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी ही कारवाई केली. बार्शी तालुक्यातील दोनशे रास्त भाव धान्य दुकानांची दहा मंडल अधिकारी आणि ७८ पथकांद्वारे तपासणी करण्यात आली.
या तपासणीत दोषी आढळलेल्या सहा दुकानांवर कारवाई करण्यात आली. संतोष अरुण गोडसे, उपळाई ठोंगे, (१६०, परवान्यात नमूद ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी धान्याची साठवणूक करणे. पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल). महिला दूध उत्पादक संस्था, उंबरगे, (३४, साठा रजिस्टरमध्ये अनियमतता, वजनकाटा पडताळणी केली नाही. दुकानाची अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड), नारायण महादेव गोरे, चिखर्डे (६१, मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, परवाना निलंबित). संतोष विलास गोडसे, अरणगाव (१६०, शासकीय धान्य साठ्याबाबत,गुन्हा दाखल असल्याने दुकानाचा परवाना रद्द). शोभाताई सोपल महिला बचतगट, पानगाव (८४, मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड). मोहन अर्जुन संकपाळ, झरेगाव (६८, मोफत तांदूळ वाटपाबाबत तक्रार, अनामत रक्कम जप्त, पाच हजार रुपये दंड). या कारणांमुळे या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
४२०० लोकांचे जबाब प्रकरणाचे गांभीर्य पाहून महसूल विभागाने संबंधित प्रत्यक्ष गावात जाऊन ४ हजार २०० लोकांचे जबाब घेण्यात आले. त्या जबाबात लोकांनी अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेचे धान्य मिळाले नसल्याची तक्रार केली. त्या अनुषंगाने संबंधित दुकानांचा पंचनामा करून दप्तर तपासणी करण्यात आली.