सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेनऐवजी प्रयोगशाळेतील चाचण्यांवर भर दिला जाणार आहे. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठ लोकांची अँटीबॉडीज टेस्ट करण्यासाठी किटची आॅर्डर दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जुलै व आॅगस्ट महिन्यात ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. आॅगस्ट महिन्यात मृत्यूदर वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाला बळी पडणाºयांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींचे प्रमाण जास्त असून त्यांना वेळेत उपचाराबरोबरच आरोग्य तपासणीकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीणमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या अँटीबॉडीज टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात २५ हजार व नंतर आणखी दहा हजार किट पुरविण्याबाबत संबंधीत कंपनीकडे आॅर्डर नोंदविण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ग्रामीणमधील स्थितीचा आढावा घेतला आहे. पंढरपूर, बार्शी, करमाळा, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा येथे रुग्ण आढळून येत असल्याने रॅपिड अँटीजेन चाचण्यांऐवजी प्रयोगशाळेतील चाचण्यांवर भर देण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे आता नियोजन करण्यात येत आहे.
आता ग्रामीणला आहे गरज शहरातील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले होते. महापालिकेचे आरोग्य अधिकारी संतोष नवले ऐनवेळी रजेवर गेल्याने क्षयरोग विभागाचे उपसंचालक डॉ. शीतल जाधव यांच्याकडे महापालिकेचा पदभार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला. त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, विजय लोंढे, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे यांच्याबरोबर अनेक कर्मचारी व शिक्षकांची सेवा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नियोजन करून शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणला व मृत्यूदरही कमी केला आहे. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
काय होईल फायदाअँटीबॉडीज चाचणी केल्यावर संबंधीत व्यक्तीला कोरोना संसर्ग होऊन गेला आहे काय हे स्पष्ट होते. शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजवरून ही बाब स्पष्ट होत असल्याने त्या व्यक्तीची काळजी दूर होते. ज्या व्यक्तींमध्ये अशा अँटीबॉडीज नसतील त्यांना इतरांपासून दूर ठेवण्याची सूचना करून कोरोनापासून बचाव करता येणे शक्य होणार आहे.
झेडपी कर्मचारी परत पाठवामे, जून आणि जुलै महिन्यात सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्हा परिषदेचे कर्मचारी व अधिकाºयांची सेवा महापालिकेकडे वर्ग करण्यात आली होती. आता जिल्ह्यात कोरोना वाढल्याने झेडपीचे अधिकारी व कर्मचारी परत पाठवा, अशी मागणी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे.