अकलूजसह सोलापूर जिल्ह्यातील विविध आगारांतून एसटीला कोरोना प्रतिबंधक कोटिंग करण्यात येत आहे. यामध्ये सोलापुरातील ७४, बार्शीतील १०, अक्कलकोटमधील ४६, करमाळ्यातील २३, कुर्डूवाडीतील ४७ एसटी व अकलूजमधील ११ एस.टी.ला कोटिंग करण्यात आले आहे. उर्वरित गाड्यांना कोटिंग करण्याचे काम वेगात सुरू आहे.
हे कोटिंग करण्यासाठी खासगी ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली असून, आगारातील कर्मचाऱ्यांच्या सहायाने स्प्रेच्या माध्यमातून हे कोटिंग करण्यात येत आहे. अँटीमायक्रोबियल या केमिकलचा वापर करून एसटीच्या आतील भागात जिथे जिथे प्रवाशांचे हात लागतात किंवा त्यांचा स्पर्श होतो, अशा सर्व ठिकाणी अँटीमायक्रोबियल या केमिकलबरोबरच बॅक्टीबॅरियर आणि इतर केमिकलचा वापर करून स्प्रेमार्फत कोटिंग करण्यात येत आहे. या कोटिंगला कसलाही रंग नाही किंवा चमक नाही, त्यामुळे हे सहसा दिसून येत नाही. परंतु, एकदा ते स्प्रे केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत त्याचा प्रभाव राहतो.
..............
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रवाशांना सुरक्षा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बसमध्ये कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी अँटीमायक्रोबियल कोटिंग करण्यास सुरुवात केली आहे. अकलूज आगारातील एकूण ३४ एसटी बसना कोटिंग करण्यात येणार असून, त्यापैकी ११ गाड्यांचे कोटिंग पूर्ण झाले आहे. उर्वरित गाड्यांना लवकरच कोटिंग करण्यात येईल.
-तानाजी पवार, आगार व्यवस्थापक, अकलूज