सोलापूर : जशी आजपर्यंतची यात्रा झाली.. तशी यंदाचीही यात्रा पारा पाडताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू. यात्रेतील चार प्रमुख सोहळे पार पाडताना गड्डा मैदानावर दुकानं थाटणार अन् पाळणेही फिरणार, अशी भूमिका घेत श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी बुधवारी सायंकाळी परंपरेनुसार यात्रा साजरी करण्याचा ठराव बैठकीत केला. दरम्यान, बैठकीनंतर काही निवडक सदस्य पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन चर्चा केली. चार प्रमुख सोहळ्यांचा नेमका आराखडा देण्याची सूचना केली.
कोरोनाच्या संसर्ग होऊ नये यासाठी यंदा यात्रेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात्रेला नऊ-साडेनऊशे वर्षांची परंपरा आहे. यात्रेत खंड पडू नये यासाठी साधेपणाने का होई्ना यात्रेस परवानगी देण्याचा सूर भक्तगणांमध्ये ऐकावयास मिळत होता. महापालिकेने पंच कमिटीस प्रस्ताव देण्यास सांगितले होते. तशी लेखी सूचना पंच कमिटीला मिळाली नसल्याचेही सांगण्यात आले. त्याबाबत भूमिका ठरवण्यासाठी पंच कमिटीच्या कार्यालयात सदस्यांची बैठक घेेण्यात आली. अध्यक्षस्थानी धर्मराज काडादी होते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही यात्रेतील विधी, गड्डा मैदानावर दुकानं भरवण्यास अन् मनोरंजनाचे स्टॉल (पाळणेसह) भरवण्याचा ठराव काडादी यांनी केला. त्या ठरावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
बैठकीस सदस्य सिद्धेश्वर बमणी, बाळासाहेब भोगडे, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. व्ही.एस. आळंगे, आप्पासाहेब कळके, सोमशेखर देशमुख, भीमाशंकर पटणे, ॲड. आर.एस. पाटील, अष्टगी, गुरु माळगे, चिदानंद वनारोटे, सुभाष मुनाळे, विश्वनाथ लब्बा, शिवकुमार पाटील आदी उपस्थित होते.
कुठल्या विधीला किती माणसं; नेमके सांगा !
पंच कमिटीने यात्रा साजरी करण्याचा निर्धार करीत तसा ठरावही केला. त्यानंतर धर्मराज काडादी यांनी आपल्या काही निवडक सदस्यांसह मनपा आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांना यात्रेचा इतिहास सांगताना चार प्रमुख सोहळ्यांची माहिती देण्यात आली. त्यावर मनपा आयुक्त म्हणाले, कुठल्या विधीला किती मानकरी, किती भक्त असतील? मानाच्या सात नंदीध्वजांबरोबर किती नंदीध्वजधारक, मानकरी असतील? यात्रेत सहभागी होणाऱ्या भक्तगणांवर काय निर्बंध असतील? कोरोनाविषयी पंच कमिटी काय काळजी घेणार आहे आदी प्रश्न करीत नेमका प्रस्ताव अथवा आराखडा देण्याची सूचना केली. प्रस्ताव अथवा आराखडा आल्यास जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय होईल. निर्णयाचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवून देण्यात येईल. त्यानंतरच यात्रेचा मार्ग मोकळा होईल, असे पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.
मानकऱ्यांना विश्वासात घेऊनच आराखडा- काडादी
यात्रेतील प्रमुख मानकरी, सातही नंदीध्वजांचे प्रमुख, नंदीध्वज पेलणारे निवडक भक्तगण यांना विश्वासात घेऊनच आराखडा तयार करण्यात येईल. एक-दोन दिवसांमध्ये हा आराखडा मनपा आयुक्तांना सादर करण्यात येईल. वास्तविक कोरोनाच्या भीतीने यंदा यात्रेत भक्तगणांची संख्या रोडावणार आहे. मोठ्या संख्येने यात्रेत न येण्याचे आवाहनही पंच कमिटीच्या वतीने करण्यात येईल. शासनाने जे काही नियम अन् अटी घालून देतील, त्या अटींचा काटेकोरपणे पालन करण्यात येईल. मात्र, यात्रा खंडित होऊ नये, ही भक्तगणांची अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे.
नऊ-साडेनऊशे वर्षांच्या यात्रेची परंपरा खंडित होऊ नये. यात्रा पार पाडताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची पुरेपूर काळजी पंच कमिटी घेईलच. शासनाने नियम अन् अटी घालून दिल्यास पंच कमिटीच्या वतीने भक्तगणांवर निर्बंधही घालण्यात येतील. आजवर सोलापूरकरांवर कधीच संकट आले नाही. यात्रेतही कोरोनाचे संकट दूर होईल, अशी अपेक्षा आहे.
ॲड. मिलिंद थोबडे,
सदस्य : सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.