अकलूज : शासनाच्या वतीने चारा छावण्यांसाठी अनुदान देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र या अनुदानापेक्षा खर्चच अधिक होतो. चारा छावण्या या फायदा मिळविण्यासाठी चालविल्या जात नाहीत तर मुक्या प्राण्याला चारा, पाणी मिळावे म्हणून चालविल्या जातात, परंतु माहितीच्या अधिकाराखाली कुणी तरी अर्ज करतो आणि संस्थांना नाहक चौकशीला सामोरे जावे लागते. त्यामध्ये वेळ, पैसा व नाहक बदनामीला सामोरे जावे लागते अशी टीका खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली.
याबाबत तालुक्यातील सहकारी व सेवाभावी संस्थांची बैठक खा. मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकार महर्षी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात घेण्यात आली. बैठकीस पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सूळ, नायब तहसीलदार तुषार देशमुख, एन. डी. काळे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश रेडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागीरदार, पंचायत समिती सदस्य प्रताप पाटील, गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते, शोभा साठे, विद्या वाघमोडे, हेमलता चांडोले, ताई महाडिक, लतिका कोळेकर, शिवामृत दूध संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार, संचालक संग्राम रणवरे, २१ टंचाई गावातील विकास सोसायटीचे चेअरमन, सचिव, ग्रामसेवक व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत एकाही संस्थेने चारा छावणी सुरू करण्याबाबत अनुकूलता दर्शविली नाही. माळशिरस तालुक्यातील टंचाई व दुष्काळी परिस्थिती पाहता जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाचे जाचक नियम, आर्थिक असक्षमता यामुळे कोणतीही सहकारी संस्था वा सेवाभावी संस्था चारा छावणी काढण्यास तयार नाही. सर्व अडचणी लक्षात घेऊन शासनाने विनाविलंब चारा डेपो सुरू करावा असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून चारा डेपो सुरु करावा, अशी मागणी केली. माळशिरस तालुक्यातील पिलीव, सुळेवाडी, झंजेवस्ती, पठाणवस्ती, शिंगोर्णी, बचेरी, काळमवाडी, पिरळे, भांब, गारवाड, मगरवाडी, कन्हेर, जळभावी, रेडे, गिरवी, कोथळे, गोरडवाडी, फोंडशिरस, शेंडेवाडी, कारुंडे व फडतरी या २१ गावात दुुुुष्काळामुळे सध्या मोठ्या प्रमाणात चारा टंचाई जाणवत आहे. या २१ गावात लहान ७ हजार ४९८ व मोठी २९ हजार ७५६ अशी एकूण ३७ हजार २५४ जनावरांची संख्या आहे. लहान जनावरांना प्रतिदिन सुमारे ७.५ तर मोठ्या जनावरांना प्रतिदिन १५ किलो हिरव्या चाºयाची गरज आहे. तालुक्यात आता केवळ चार दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक आहे. साखर कारखाने बंद झाल्याने उसाचा चारा मिळेनासा झाला आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. त्यासाठी येत्या ४ दिवसात पिलीव, नातेपुते व माणकी येथे चारा छावण्या उघडणे गरजेचे असल्याचे मोहिते-पाटील म्हणाले.
चारा डेपो सुरू करा अन्यथा आंदोलन च्शासनाच्या जाचक अटी व चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेक सहकारी व सेवाभावी संस्था चारा छावण्या चालविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील हजारो जनावरांवर उपासमारीची वेळ येऊन पडली. जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्यापूर्वीच शासनाने या टंचाईग्रस्त २१ गावात येत्या आठ दिवसात चारा डेपो सुरु करावा, परंतु चारा, पाण्यावाचून जनावरे उपाशी मरु देऊ नयेत, असे झाले तर तालुक्यातील शेतकरी व जनावरांसह तहसील कार्यालयावर आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी दिला.