महाआघाडीचे काहीही होवो; सोलापूर मध्यची जागा माकप लढवणारच : अशोक ढवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:06 PM2019-02-23T14:06:01+5:302019-02-23T14:08:32+5:30
महेश कुलकर्णी सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही या ...
महेश कुलकर्णी
सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने समविचारी पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही या आघाडीत समावेश आहे. विधानसभेला हीच महाआघाडी कायम राहिली तरी सोलापूर मध्य ही विधानसभेची जागा आम्ही काहीही केले तरी लढविणार असल्याचे माकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य अशोक ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. या प्रयत्नाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रतिसाद दिला असून, महाआघाडीत सहभागी होण्याचे मान्य केले आहे. यासाठी महाराष्टÑातील दिंडोरी आणि पालघर या दोन लोकसभेच्या जागा मागितल्या आहेत. हीच युती विधानसभेलाही कायम ठेवून माकपची ताकद असलेला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघही माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यासाठी मागितला आहे.
या मागणीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सध्या आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे असलेला हा विधानसभा मतदारसंघ देता येणार नाही, असे सोलापुरात वक्तव्य केले होते. याविषयी माकपचे केंद्रीय सचिव मंडळाचे सदस्य अशोक ढवळे यांना विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देशात महाआघाडीचे काय व्हायचे ते होवो, आम्ही सोलापूर मध्य विधानसभा लढविणार आहोत. एवढेच नव्हे तर तीन वेळा आमदार राहिलेले आमचे राज्य समितीचे सदस्य नरसय्या आडम मास्तर हेच याठिकाणी उमेदवार राहतील. यामुळे काँग्रेससमवेत माकपने केलेल्या महाआघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. महाआघाडी लोकसभेपुरती आहे, असे जरी म्हटले तरी विधानसभेचा प्रश्न अनुत्तररित राहतो.
सोलापुरात काँग्रेसने लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केलेली आहे. आ. प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार आहेत. एकीकडे माकपने काँग्रेसला मदत करायची, असे ठरविले तरी आडम यांच्या महत्त्वाकांक्षी रे नगर घरकूल प्रकल्पास भाजपा सरकारने मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर बँक गॅरंटीच्या प्रश्नामुळे या घरांना सरकारकडून मिळणारे अनुदानही अडकलेले असताना केंद्रात महाआघाडी झाली तरी सोलापुरात माकपचे कार्यकर्ते काँग्रेसला कितपत मदत करतील, ही शंका व्यक्त होत आहे.