सोलापूर : एका शेतकऱ्याच्या उसाची अनेक साखर कारखान्यांकडे नोंद होत असल्याने लागवड क्षेत्रापेक्षा अधिक ऊस नोंद होतो. पर्यायाने साखर कारखान्यांच्या गाळप नियोजनावर परिणाम होतो. यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने उसाची अचूक नोंद ठेवणारे ''ॲप'' डेव्हलप केले असून, एकापेक्षा अधिक नोंद असलेल्या शेतकऱ्यांची नावे साखर कारखान्यांना कळवली जाणार आहेत.
राज्यात साखर कारखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने खासगी साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरीलही उसाची नोंद करतात. सहकारी साखर कारखाने शक्यतो कार्यक्षेत्रातीलच उसाची नोंद धरतात मात्र खासगी कारखाने सहकारी कारखान्यांच्या क्षेत्रातीलही उसाची नोंद धरतात. जो-तो साखर कारखाना आपल्याकडील ऊस नोंद साखर आयुक्तांना कळवितात. साखर कारखान्यांनी कळविलेल्या आकडेवारीनुसारच गाळप नियोजन केले जाते. कारखान्यांकडील नोंद व प्रत्यक्षात गाळपासाठी येणारा ऊस यामध्ये बराच फरक येतो. त्यामुळे सर्वच अंदाज चुकीचे ठरत आहेत.
यामुळे साखर आयुक्त कार्यालयाने ॲप डेव्हलप केला आहे. राज्यातील साखर कारखान्यांना ऊस नोंद शेतकऱ्यांची नावे, गट नंबर व इतर माहिती मागविली आहे. ही माहिती साखर आयुक्त कार्यालयाला ऑनलाइन पाठवायची आहे. तेथे शेतकऱ्यांची यादी संगणकावर तपासणी करून एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असलेली नावे बाजूला काढली जाणार आहेत. ही यादी त्या-त्या साखर कारखान्यांना कळवली जाणार आहेत. साखर कारखानेही हा ॲप वापरू शकतात, असे साखर सहसंचालक पांडुरंग शेळके यांनी सांगितले.
ऊस तोडणीला आला
- मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दोन लाख ९० हजार हेक्टर, तर कृषी खात्याने एक लाख ६१ हजार हेक्टर ऊस नोंद कळवली होती. प्रत्यक्षात एक लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस तोडणीला आला.
- मागील वर्षीच्या राज्यातील साखर कारखान्यांच्या माहितीच्या आधारे पहिला अंदाज आठ लाख ७३ हजार मेट्रिक टन गाळप गृहीत धरले होते. गाळप सुरू करताना दुसरा अंदाज दहा लाख ५९ हजार मेट्रिक टनाचा व्यक्त केला होता. प्रत्यक्षात १० लाख १२ हजार मेट्रिक टन इतके गाळप झाले.
एका-एका शेतकऱ्यांच्या उसाची आठ-आठ साखर कारखान्यांना नोंद होत असल्याचे आढळले आहे. याला शेतकरी व साखर कारखानेही जबाबदार आहेत. मात्र यामुळे गाळप नियोजनावर परिणाम होतो.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे