सोलापूर : महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने लाख रुपयांची मदत करण्यात आली. या रकमेचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. याची माहिती मदत कक्षचे सोलापूर जिल्हा समन्वयक अतुलराजे भवर यांनी दिली.
दक्षिण सोलापूर तालुक्यात बोरामणी येथील अप्पालाल शेख यांनी १९९२ साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळविला. अनेक पैलवानांना अस्मान दाखवणाऱ्या आप्पालाल शेख यांची अवस्था दयनीय झाली आहे. याची दखल घेत कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. १९८० साली आप्पालाल यांचे बंधू ईस्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. भावाचा वारसा पुढे नेत १९९२ ला आप्पालाल यांनी देखील महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बल्गेरिया आणि इराण येथील विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील त्यांची निवड झालेली होती. त्यात यश आले नाही; मात्र १९९१ ला न्यूझीलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्णपदक देखील पटकावले आहे. तसेच पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील २००२ ला महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच कुटुंबात तीन महाराष्ट्र केसरी झाले. आप्पालाल यांची मुले गौसपाक, अश्पाक आणि अस्लम हे देखील तोच वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करताहेत. वडिलांचे आजारपण आणि दुसरीकडे कुस्तीचा सराव दोन्हीच्या मदतीसाठी आधाराची गरज होती.