सोलापूर : स्वतःच्या मालकी जागेवर बांधकाम करत असताना जर कोणा गुंडांकडून त्रास होत असेल किंवा खंडणीची मागणी होत असेल, तर तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेकडे तक्रार करा असे आवाहन करताना शहरातील लॅन्ड माफियांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत करवाईचा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.
शहर हद्दवाढ भागांमध्ये नागरिकांनी ओपन प्लॉट व जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. वर्षानुवर्षे तिकडे लक्ष न दिल्यामुळे गुंड प्रवृत्तीचे लोक दुसऱ्यांच्या जागेवर स्वतःचा हक्क दाखवून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजरेवाडी परिसरात स्वतःच्या मालकीच्या जागेत साफसफाई करत असताना काही गुंडांकडून लाखो रुपयांची मागणी केली जात होती. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून संबंधित गुंडा विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. हद्दवाढ भागांमध्ये अशा पद्धतीने स्वतःची मालकी असलेल्या जागेवर बांधकाम करण्यास किंवा येण्यास मज्जाव केला जात असेल. वारंवार त्रास दिला जात असेल तर लोकांनी न घाबरता तत्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेत संपर्क साधावा. संबंधित गाव गुंडांवर तत्काळ कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी लोकमतशी बोलताना केले आहे.
जागा बळकावण्यासाठी केली जाते दमदाटी
- हद्दवाढ भागात बहुतांश लोकांनी भविष्यातील गुंतवणूक म्हणून जागा खरेदी करून ठेवले आहेत. जागा मालक कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे आदी परगावी असतात. वर्षानुवर्ष ते जागेकडे येत नसतात याचा गैरफायदा घेऊन काही गुंड प्रवृत्तीचे लोक जागामालकांना धमकावण्याचा प्रयत्न करतात. घाबरून मूळ मालक आपल्याला काहीतरी पैसे द्यावेत हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. काही गुंड आजूबाजूला असलेल्या ओपन फ्लॅटच्या ठिकाणी एखादा प्लॉट विकत घेतात. त्यानंतर ते आजूबाजूच्या फ्लॅट धारकांना मानसिक त्रास देतात. जागा विकायला भाग पाडतात असे प्रकार सर्रास सोलापुरात घडत असतात. अशा पद्धतीची दादागिरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.