सोलापूर : सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे़ पुढच्या वर्षी मार्चमध्ये नूतन इमारतीचे लोकार्पण होणार आहे़ त्यानंतर सोलापुरात थेट धर्मादाय सहआयुक्त कार्यालय सुरू होणार आहे़ या कार्यालयास प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा असणार असल्याची माहिती पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सोलापुरात सुनावणीत समाधान न झालेले तक्रारकर्ते हे पुण्यातील सहआयुक्त कार्यालयाकडे अपील करतात. त्यामुळे येथील नागरिकांना तसेच संस्था पदाधिकाºयांना दर मंगळवारी पुणे दौरा करावा लागतो़ पुढच्या वर्षापासून सहआयुक्त दर्जाचे अधिकारी सोलापुरातच सुनावणी घेतील़ अपील कोर्ट चालवतील़ त्यामुळे सोलापूरकरांची होणारी गैरसोय कायमची थांबेल़ अपील कोर्टमुळे तब्बल ३५ हजार धर्मादाय संस्थांना दिलासा मिळेल़ तसेच सोलापूर सोबत आणखी दोन जिल्ह्यांचे कामकाज देखील येथील सहआयुक्त कार्यालयातून चालेल़ यास उस्मानाबाद जिल्ह्यातील बार असोसिएशनचा ठराव संमत झाला आहे़ यासोबत सांगली जिल्हाही जोडण्याची शक्यता आहे.
सध्या सोलापुरात सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय कार्यरत आहे़ धर्मादाय आयुक्त म्हणून स्मिता माने या काम पाहत आहेत़ त्या न्यायिक अधिकारी असून हायकोर्टाकडून त्यांची नियुक्ती झालेली आहे़ त्यांच्या अंतर्गत तीन सहायक धर्मादाय आयुक्त पदे कार्यरत आहेत़ सहायक धर्मादाय आयुक्त म्हणून माधव बोराळे आणि राजेश परदेशी हे काम पाहत आहेत़ हे दोघेही न्यायिक अधिकारी आहेत़ दोघांची नियुक्ती हायकोर्टाकडून झाली आहे़ तिसºया सहायक धर्मादाय आयुक्त पद हे शासनाकडून नियुक्त झालेले आहे़ पण सध्या हे पद रिक्त आहे़ सहआयुक्त कार्यालय सुरु झाल्यानंतर सहआयुक्त दर्जाचे अधिकारी सोलापुरात रुजू होतील़ त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी देखील कामकाज पाहतील.
सध्या सोलापुरात सुनावणी झालेल्या प्रकरणाविरोधात पुणे येथील धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्याकडे अपील करता येते़ सहआयुक्त देशमुख यांच्याकडील सुनावणी विरोधात थेट हायकोर्टात अपील करता येते़ सहआयुक्त कार्यालय सोलापुरात सुरु झाल्यास येथील प्रकरणांवर इथेच अपील करता येईल त्यानंतर थेट हायकोर्टात जाता येईल़ आतापर्यंत सर्व अपीलकर्ते पुण्याची वाट धरत होते़ पुढच्या वर्षापासून पुणे प्रवास थांबेल.
सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना सोलापुराला धर्मादाय सहआयुक्त कार्यालयास तत्वत: मंजुरी दिलेली आहे़ सोलापुरात मोठी इमारत नसल्याने सहआयुक्त कार्यालय सुरू झालेले नाही़ पुढच्या वर्षी नवीन इमारत सुरू होईल़ त्यानंतर सहआयुक्त कार्यालय आणि अधिकारी सोलापुरात रूजू होतील़ याकरिता पुणे येथील सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी खूप पाठपुरावा केला़ त्यांच्या प्रयत्नातून सहआयुक्त कार्यालय सुरू होईल़ तशी ग्वाही देखील त्यांनी नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिली़ विशेष म्हणजे, नवीन इमारतीत त्यांनी साडेतीनशे चौरस मीटर इतका मोठा हॉल बार असोसिएशनला देणार आहेत. यामुळे वकील बांधव तसेच नागरिकांची गैरसोय थांबेल़ - अॅड. नितीन हबीबज्येष्ठ विधीज्ञ, सोलापूर