सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १७ जुलै पर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना १७ जुलै पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. पदवी उत्तीर्ण विद्यार्थी व पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे. पदार्थविज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स- अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्सड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी आणि एमएससी इलेक्ट्रॉनिक्स करिता २५ जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे.