सोलापूर : कुंभारी येथील गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यासाठी शंभर टीमद्वारे वसाहतीतील सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण होणार असून त्याचबरोबर घरपोच धान्य, मेडिकल सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
गोदूताई परुळेकर वसाहत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांची आढावा बैठक आज झाली. या बैठकीस पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, गोदूताई परुळेकर विडी घरकुल वसाहतीमध्ये ६० हजार नागरिक राहतात. या वसाहतीमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी १०० टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. या टीम कडून येत्या दोन दिवसात वसाहतींमधील प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. नागरिकांनी आपल्या घरातील ज्येष्ठ नागरिक व त्यांचे आजार तसेच आवश्यक माहिती प्रशासनास देऊन सहकार्य करावे. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित रहावे. प्रशासनाकडून वसाहतीमध्ये रेशन धान्य, दूध, मेडिकल सेवा आणि दोन अॅम्ब्युलन्सची येथे व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. गोदूताई परुळेकर वसाहतीसाठी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शंभर विशेष पोलिस अधिकाºयांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या माध्यमातून येथील नागरिकांना सहकार्य करण्याबरोबरच शासनाच्या सूचना पोहोचविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. सर्वेक्षणास येणाºया कर्मचाºयांना नागरिकांनी माहिती द्यावी. आजार अंगावर काढू नये, लपवून ठेवू नये, असेही त्यांनी आवाहन केले.