सोलापूर : मोठ्या आर्थिक गर्तेत असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, प्रशासकीय मंडळाने सोमवारी पदभार घेतला. दूध संघावर २४ कोटी रुपयांचा डोंगर असल्याचे आव्हान प्रशासक मंडळासमोर आहे.
२०१८ मध्ये संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गाडा अद्यापही रुळावर आला नसतानाच जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या जिल्हा सहकारी दूध संघ मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळेच मागील वर्षी संघाच्या मालकीची मुंबईतील जागा विक्रीला काढली होती; मात्र तत्कालीन चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांच्या या भूमिकेला काही संचालकांनी कडाडून विरोध केला होता.
संघ मोठ्या अडचणीत असल्याने दूध उत्पादकांचे पैसे वेळेवर मिळत नव्हते. पर्यायाने दोन-दोन महिने दुधाचे पैसे मिळत नसल्याने दूध संकलनात मोठी घट झाली होती. घटणारे दूध संकलन, वाढणारा तोटा, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा अवाढव्य खर्च, याचा विचार करून मागील वर्षी सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला विभागीय उपनिबंधक ( दूध) सुनील शिरापूरकर यांनी संचालक मंडळ का बरखास्त करु नये? अशी नोटीस एक फेब्रुवारी २०२० रोजी बजावली होती. यावर सुनावणी घेऊन दूध संघाचे म्हणणे ऐकून घेण्यात आले होते. नोटीस दिल्यानंतर वर्षभरातही कारभारात सुधारणा झाली नसल्याने सोमवार दिनांक ८ मार्च रोजी संचालक मंडळ बरखास्त करून
प्रशासकीय मंडळाने पदभार घेतला. प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून विभागीय उपनिबंधक(दूध) सुनील शिरापूरकर तर सहायक निबंधक(दूध) आबासाहेब गावडे, सहकार अधिकारी सहकारी संस्था ( दूध) सुनील शिंदे हे सदस्य म्हणून नियुक्त केले आहेत.
दूध संकलन
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर सध्या २४ कोटी रुपये इतके कर्ज असून मागील सहा महिन्यात चार कोटी कर्ज काढून शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दूध संकलनही अवघे ५० हजार लिटर इतके होत आहे.
दूध संकलनात वाढ करणे, काटकसरीने कारभार करून आर्थिक तोटा कमी करणे, वेतनावरचा खर्च कमी करून दूध संघ सावरण्याचा प्रयत्न केला जाईल.
- सुनील शिरापूरकर
अध्यक्ष, प्रशासकीय मंडळ, जिल्हा दूध संघ.