सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील ७०० लोकसंख्या असणाऱ्या घाटणे गावच्या ग्रामपंचायतीत सात सदस्य आहेत. सद्य:स्थितीला गावात मोजकीच कुटुंबे राहत असून, इतर सर्व कुटुंबे कोरोना महामारीच्या भीतीने वाड्या-वस्त्यांवर राहत आहेत. गावात या दुसऱ्या लाटेत कोरोना महामारीचे सहा रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी एक रुग्ण मयत झाला असून, उर्वरित पाच रुग्ण बरे झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर गावचे युवा सरपंच ऋतुराज देशमुख यांनी गाव कोरोनामुक्त केल्याचा रिपोर्ट वरपर्यंत पोहोचविला गेला. गावात विविध वेगवेगळे उपक्रम राबवीत, गावातील सर्वांचे लसीकरण करण्यात आले आहे. सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. गावात घरोघरी सॅनिटायझरचा वापर केला असून, संपूर्ण गाव फवारणी करण्यात आली आहे. अशाप्रकारे काळजी घेऊन गाव कोरोनामुक्त केल्याचेही ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.
३० मे रोजी या युवा सरपंचांच्या कामाची दखल घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी ऋतुराज देशमुख यांचे कौतुक केले होते.
गावातील काही नागरिकांनी सरपंचांनी संपूर्ण गावात कुठल्याही प्रकारची अद्याप फवारणी केलेली नाही, आणलेले सॅनिटायझर ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच आहे. मास्कचे वाटप केले नाही. याशिवाय लस नोंदणीसाठी ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये माझ्याकडे येऊन नोंद केली तरच लस दिली जाईल, अशी भूमिका घेऊन गावात काम केल्याचा आरोप एका गटाने केला. यावेळी दस्तुरखुद्द युवा सरपंच समोर उपस्थित होते. त्यांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
केवळ खोटी माहिती देऊन स्टंटबाजी केल्याच्या आरोपामुळे घाटणे गाव चर्चेत आले आहे
----
मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेय म्हटल्यानंतर विरोध हा होणारच. विरोधक आहेत, सर्वच सोबत असतील असे नाही. गावात येऊन चौकशी करा.
- रुतुराज देशमुख
सरपंच, घाटणे
---
सरपंचांनी गावात फवारणी केलेली नाही. सॅनिटायझर व मास्कचे वाटप त्यांना मानणाऱ्या लोकांनाच केले आहे. याशिवाय लसीकरणाच्या नोंदणीसाठी माझ्याकडे येऊन ग्रामपंचायतीमध्ये जे नोंद करतील, त्यांनाच लस मिळणार आहे, अशी भूमिका सरपंचांनी मांडली होती.
- खेलू माने, ग्रामपंचायत सदस्य, घाटणे
---
फोटो : ३१ घाटणे
युवा सरपंचांसमोर सर्वसामान्यांनी कोरोना निर्मूलनाच्या कार्याबाबत प्रश्न केले. यावेळी काही वेळ गोंधळ उडाला.