सोलापूर: नदीकाठच्या गावांसाठी पाणी शुद्धीकरण(आरओ) आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. २०१४-१५ च्या सुधारित २७५ कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन मंडळाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात रविवारी झाली. बैठकीला जि.प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, महापौर अलका राठोड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, आमदार सिद्रामप्पा पाटील, दीपक साळुंखे, लक्ष्मणराव ढोबळे, हणमंत डोळस, प्रणिती शिंदे, मनोहर डोंगरे, बाळासाहेब शेळके व नियोजन मंडळाचे सदस्य उपस्थित होते. रमाई आवास योजनेची घरे मंजूर केली व नंतर रद्द का केली?, असा प्रश्न उमाकांत राठोड यांनी उपस्थित केला. त्यावर प्रकल्प संचालक प्रभू जाधव यांनी आपण पाठविल्याप्रमाणे शासनाने रमाई आवासची २ हजार ३३४ घरे मंजूर केली होती, नंतर १५०० घरकुलांचे उद्दिष्टही देण्यात आले होते. नंतर ते रद्द केल्याचे पत्र शासनाने दिल्याचे जाधव यांनी सांगितले. समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी अगोदर घरे मंजूर करता नंतर रद्द का करता?, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री सोपल यांनी वरिष्ठ पातळीवर बोलून न्याय देऊ असे सांगून विषय थांबविला. आय.टी.आय.ला यंत्रसामुग्री खरेदीसाठी दिलेली ५३ लाख १४ हजारांच्या अखर्चित रकमेवर चर्चा झाली. प्राचार्य सावंत यांनी आम्हाला ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याचे अधिकार नाहीत, वरिष्ठांनी मंजुरी दिली नसल्याने रक्कम अखर्चित राहिल्याचे सांगितले. मुली व मुलांची वसतिगृहे कोणत्या तालुक्यात नाहीत असे आमदार दीपक साळुंखे यांनी विचारले. समाजकल्याण अधिकारी मनीषा फुले यांनी मुलांची १५ व मुलींची सहा वसतिगृहे असल्याचे सांगितले. अंकोली आरोग्य केंद्राच्या अर्धवट व निकृष्ट बांधकामाचा मुद्दा तिसर्यांदा बाबासाहेब क्षीरसागर यांनी मांडला. बैठक संपताच क्षीरसागर यांच्यासोबत दवाखान्याची पाहणी करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता संजय माळी यांना पालकमंत्र्यांनी दिल्या. हिप्परगा तलावातून दक्षिण तालुक्यासाठी असणार्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे पाणी हिप्परग्याचे नागरिक पाईप फोडून घेत असल्याचे उमाकांत राठोड म्हणाले. तत्काळ बंदोबस्त करा, पोलिसांत गुन्हा दाखल करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. गारपीटग्रस्त उर्वरित शेतकर्यांना मदत द्या, सीना नदीत पाणी सोडण्याचे पत्र सुरेश हसापुरे यांनी दिले़
---------------------------------
इंदिरा आवासचे दोन कोटी ४० लाख अखर्चित़ जिल्हा नियोजनने २०१४-१५ चा २५२ कोटी ३९ लाखांचा आराखडा मंजूर केला़ राज्य नियोजनकडे वाढीव ५० कोटी देण्याची मागणी केली होती़ त्यानुसार २२ कोटी ६१ लाखांची वाढीव रक्कम मिळाल्याने २७५ कोटींच्या आराखड्याला मान्यता दिली़ नदीकाठच्या गावांना पाणी शुद्धीकरणासाठी आरओ सिस्टिम बसविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना़ मुला-मुलींच्या वसतिगृहाला जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकार्यांनी स्वतंत्र बैठक घ्यावी, असे आ. साळुंखे म्हणाले. उत्तर व दक्षिण तालुक्याच्या ग्रामीण भागातही मुला-मुलींची वसतिगृहे सुरू करावीत, असे पालकमंत्री म्हणाले.