सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात नव्याने ६ इथेनॉल प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्याने आता जिल्ह्यात प्रकल्पांची संख्या २५ इतकी झाली आहे. कार्यान्वित झालेल्या १९ प्रकल्पातून ९ लाख १० हजार लिटर तर नव्या प्रकल्पामुळे ३ लाख ३५ हजार असे प्रतिदिन १२ लाख ३५ हजार लिटर असे इथेनॉल तयार आहे.
साखर उद्योगाला चालना मिळणाºया इथेनॉल प्रकल्पांसाठी केंद्राने कर्जाच्या माध्यमातून अर्थसहाय्यही दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांचे १६ व स्वतंत्र तीन असे १९ इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहेत. विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, शंकर सहकारी, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील अनगर, लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ, जकराया शुगर, सिद्धेश्वर सहकारी, युटोपियन शुगर, पांडुरंग सहकारी, फॅबटेक शुगर, चंद्रभागा साखर कारखाना, विठ्ठल सहकारी गुरसाळे, सासवड माळी शुगर, मकाई सहकारी, इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्याचे तर ग्लोबस टेंभुर्णी, सिद्धनाथ टेंभुर्णी व खंडोबा टेंभुर्णी या तीन स्वतंत्र अशा १९ कार्यान्वित डिस्टिलरी प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांची प्रतिदिन इथेनॉल निर्मिती क्षमता ९ लाख १० हजार लिटर इतकी आहे.
नव्याने युटोपियन शुगर, बबनरावजी शिंदे शुगर, गोकुळ शुगर, श्री संत कूर्मदास साखर कारखाना, विठ्ठल रिफार्इंड शुगर व मातोश्री लक्ष्मी शुगर या कारखान्यांना डिस्टिलरी प्रकल्प मंजूर झाले असून सध्या सुरू असलेल्या विठ्ठलराव शिंदे सहकारी व विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव दोन डिस्टिलरी प्रकल्पांची क्षमता वाढीस मंजुरी मिळाली आहे. या नव्या व विस्तारित प्रकल्पासाठी कर्जाच्या माध्यमातून ४६९ कोटी ५९ लाख रुपयेही मंजूर केले आहेत. नव्या प्रकल्पांना मंजुरी देत केंद्र सरकारने मागील वर्षी इथेनॉलचा प्रतिलिटर ४० रुपये ८५ पैसे असलेला विक्रीदर वाढवून ५९ रुपये १९ पैसे केला आहे.