कुसळंब : बार्शी तालुक्यात पांगरी जिल्हा परिषद गटातील गावातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यापैकी काही कामे सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या डॉ. रेखा राऊत यांनी दिली.
यामध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत वालवड, चारे, बोरगाव रस्ता व चारे - म्हसोबावाडी रस्ता, पांगरी - यमाईदेवी मंदिर, टोणेवाडी - कारी रस्ता या कामासाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या १५ व्या वित्त आयोगातून पुरी, खामगाव, पांगरी या गावातील अंतर्गत रस्ते, भुयारी गटार, पाणी, पाईपलाईन याकरिता ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त करून दिला आहे.
झेडपी जनसुविधा विभागामार्फत बोरगाव, वालवड, खामगाव, पांगरी या गावाकरिता स्मशानभूमी शेड रस्ता याकरिता १५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तीर्थक्षेत्र विकास विभागामार्फत गोरमाळे घरी येथे हायमास्ट, शिक्षण विभागामार्फत पांगरी पांढरी, पाथरी, पुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग दुरुस्ती करिता प्रत्येकी दोन लाख ९० हजार मंजूर झाले आहेत.
कृषी विभागामार्फत सारे, गोरमाळे, पुरी, पांगरी या ठिकाणी सौर दिवे बसविण्यात आले आहेत. जिल्हा परिषद शेष पंपमधून पांगरी येथील शिक्षक कॉलनीत रस्ते बांधण्यात आले आहेत. पांगरी पोलीस ठाणे मुस्लिम स्मशानभूमी परिसरात हायमास्ट लावणे आदी कामे असून, काही कामे पूर्ण झाली तर काही कामे प्रगतिपथावर आहेत.
----
पुरी, धामणगाव, पिंपळगाव अंगणवाडीसाठी इमारत
समाज कल्याण विभागामार्फत पांगरी गावात अपंगांसाठी पिकअप शेड व स्टॉल उभारण्यात आले आहेत. तसेच दलित वस्तीतील रस्ते व गटारीची कामे मंजूर झाली आहेत. महिला व बाल कल्याण विभागामार्फत पुरी, धामणगाव, पिंपळगाव येथे अंगणवाडी इमारतींची कामे मंजूर केली आहेत. आरोग्य विभागामार्फत चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थाने दुरुस्तीसाठी तीन लाखाचा निधी मंजूर झाला आहे.