साेलापूर : शहरातील उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी विशेष निधी मिळावा, शहरात नवा रिंग राेड करावा, समांतर जलवाहिनीच्या वापर संपादनासाठी ४६ काेटी ८८ लाख रुपयांचा निधी मिळावा, आदी मागण्या महापाैैर श्रीकांचना यन्नम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या. गडकरींनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावर विचार करू, असे सांगितले.
महापाैर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेता शिवानंद पाटील, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी साेमवारी पंढरपुरात गडकरी यांची भेट घेतली. आयुक्त पी. शिवशंकर यांनी उड्डाणपूल आणि समांतर जलवाहिनीच्या कामाची माहिती दिली. भूसंपादनासाठी केंद्र शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी महापाैर यन्नम यांनी केली. केंद्र सरकार उड्डाणपुलासाठी ८०० ते ९०० काेटी रुपयांचा निधी देईल. भूसंपादनाचे काम राज्य शासन आणि महापालिकेने करावे असे सांगितले. आयुक्तांनी भूसंपादनासाठी कर्ज उभारणी सुरू असल्याचे सांगितले.
समांतर जलवाहिनीच्या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पुणे ते साेलापूर हायवेच्या बाजूची जागा दिली आहे. या जागेच्या वापर संपादनाचा ४६ काेटी ८८ लाख रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध व्हावा अथवा यात शिथिलता मिळावी, अशी मागणी केली. यावर विचार करू, असे सांगितले. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृह नेता शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, नगरसेवक संजय कोळी, आदी उपस्थित होते.