काशिनाथ वाघमारे , सोलापूर : उजनीधरणातून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी करमाळा-राशीन मार्गावरील वीट येथे शेतक-यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.
राष्ट्रवादी काॅग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील म्हणाले, उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील हजारो शेतक-यांच्या जमिनी पाण्यात गेल्या. धरण होऊन ४० वर्षे होऊन गेली पण तालुक्यातील चाळीस टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे. करमाळा तालुक्यातून ५० किलोमीटर अंतरावर पाणी इतर तालुक्यांना दिले जाते, परंतु तालुक्यात उजनीपासून बारा किलोमीटरील गावांना पाणी मिळत नाही. मागील दोन महिन्यांमध्ये इंदापूरची लाकडी- निंबोळी योजना मार्गी लागू शकते तर तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजना का मार्गी लागू शकत नाही ? असा सवाल मांढरे-पाटील यांनी केला.
वीट येथील रास्ता रोको आंदोलना वेळी रावगावचे सरपंच संदीप शेळके, वीटचे सरपंच महेश गणगे, अंजनडोहचे सरपंच शहाजी माने, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, राजुरीचे सरपंच भोसले, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, हिवरवाडीचे सरपंच बापू पवार, प्रा. रामदास झोळसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.