सोलापूर : किल्ल्याशेजारील हुतात्मा बाग नूतनीकरणास पुरातत्त्व खात्याने मंजुरी दिल्याने आता हे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्त तथा सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक मंडळाची अकरावी बैठक इंद्रभुवनात झाली. या बैठकीला कंपनीचे संचालक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापौर शोभा बनशेट्टी, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ढाकणे यांनी स्मार्ट सिटी योजनेतून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.
रंगभवन चौकातील स्मार्टरोडचे काम प्रगतिपथावर आहे. यात्रेनिमित्त काम २५ दिवस बंद होते. वीज वाहक तारा शिफ्ट करताना टप्प्याने काम घ्यावे लागले. आता महावीर जयंतीसाठी सुशोभीकरणासाठी चौक खुला ठेवण्यात येणार आहे. आखाडा किल्ल्यात असल्याने विकासाला अद्याप परवानगी मिळालेली नाही.
स्मार्ट सिटी योजनेतून घंटागाड्याची खरेदी सुरू आहे. चाचणीसाठी पाठविलेल्या घंटागाडीतील दोष दुरुस्त करण्यास सांगून आता इतर घंटागाड्या पुरविण्यास कंपनीला सांगण्यात आले आहे. शहरात आणखी ५0 ठिकाणी ई-टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.
घनकचरा व्यवस्थापनासाठी जुळे सोलापूर पाण्याची टाकी, सिव्हिल चौक, दयानंद कॉलेज, सलगरवस्तीजवळ अशा ठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत. घरोघरी घंटागाडीतून आणलेला कचरा मोठ्या वाहनातून डेपोकडे पाठविण्यासाठी याचा उपयोग होईल. होम मैदानाजवळ पे अॅन्ड पार्कचा प्रस्ताव आहे. तसेच होम मैदान, स्ट्रिट बाजार, स्टेडियमच्या नूतनीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. अशा विविध कामांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापौर बनशेट्टी यांनी ई-टॉयलेटसाठी आणखी जागा सुचविल्या. बैठकीनंतर रस्त्याच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्व संचालकांनी कामांना भेटी देऊन पाहणी केली.
न्यायालय, आयुक्तालयावर सौरऊर्जा...- मनपाची इमारत आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. दुसºया टप्प्यात जिल्हा न्यायालय व पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीवरही सौरऊर्जा बसविण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटीचे काम दिसण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे सुंदर करण्यावर भर दिला आहे. यातून रंगभवन चौकातील ईदगाह मैदानाचे लूक बदलण्यात येणार आहे. किल्लाबागेतील विहिरीवर हिरवळ कायम राहण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एलईडी दिवे बसविण्याचे दोनवेळा टेंडर काढण्यात आले पण प्रतिसाद न मिळाल्याने २७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले.