आप्पासाहेब पाटील
सोलापूर : दिवाळीला गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. यावर लक्ष ठेवून चोरीच्या घटना या काळात अधिक वाढतात. त्यामुळे दिवाळीत सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगायला हवी. आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीसाठी गावी जाल आणि तुमच्या घरात चोरटे दिवाळी साजरी करतील, असे व्हायला नको. यासाठी घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या तसेच घरात रोख रक्कम ठेवू नका, घरांना मजबूत दरवाजे, कुलूप आणि सेफ्टी यंत्रणा बसवा शिवाय शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
गावी जाताना मौल्यवान वस्तू, दागिने तसेच पैसे घरात ठेवणे टाळा, शक्य असल्यास एखाद्या सदस्याला घरी ठेवा. मौल्यवान वस्तू, पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, घराला चांगल्या प्रतीचे कुलूप, दरवाजे बसवा, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवा. अनेक घटनांमध्ये चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर देखील चोरून नेतात. यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीची घटना कैद होऊनही उपयोग होत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुरक्षित ठिकाणी ठेवा.
------------
घरात दागिने, रोख रक्कम ठेवू नका...
दिवाळीत बाहेरगावी जात असाल तर घरात दागिने व रोख रक्कम ठेवू नका. घराबाहेर पडताना कपाट, दरवाजे व्यवस्थित लॉक केलेत का नाही, याबाबची खातरजमा करा. शेजाऱ्यांना सांगून बाहेर पडा.
------------
सोशल मीडियावर पोस्ट टाळा
अनेकांना दिवाळी सणासाठी अथवा अन्यप्रसंगी गावी जाताना सोशल मीडियावर स्टेट्स ठेवणे, स्टोरी बनविणे अशी सवय असते. पण ही सवय तुमच्या अंगलट येऊ शकते. अनेक चोरटे सोशल मीडियावर लक्ष ठेवून असतात. तुमचे स्टेट्स पाहून तुमच्या घरात कोणी नाही, याची त्यांना खात्री होतेे. यामुळे तुमच्या घरी चोरी होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर स्टेट्स ठेवताना, स्टोरी बनविताना काळजी घ्या.
-----------
घर, सोसायटीच्या परिसरात संशयित हालचाली दिसल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अनेक घटनांमध्ये चोरटे सुरूवातीला घरांची, परिसराची रेकी करतात आणि संधी साधून घरफोडी, चोरी करतात. त्यामुळे संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना दिल्यास हा धोका टाळता येतो. दिवाळीत रोख रक्कम, दागदागिने व घरांची विशेष काळजी घ्यावी.
- सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण