सोलापूर : उजनीच्या पाणी वाटपावरून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्यात मतभेद असल्याचे दिसून आले. जिल्हा नियोजनच्या बैठकीत उजनीच्या पाणी वाटपावर बोलताना सावंत म्हणाले की, पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे तर देशमुख म्हणाले आधी तलाव भरून घ्यायचे ठरले आहे.महापालिकेच्या शाळा वर्ग करण्याच्या निर्णयाबाबतही या दोन्ही मंत्र्यांनी वेगवेगळे मत मांडले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सहपालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त दीपक तावरे, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते. बैठकीत झेडपी शाळेतील रिक्त शिक्षकांच्या जागा भरणे, सन २०१८ मध्ये मंगळवेढा व माळशिरस तालुक्यांत दगावलेल्या जनावरांची भरपाई देण्याच्या प्रस्तावावर वादळी चर्चा झाली. सभा लांबल्यामुळे आमदार भारत भालके यांनी इतर कामांसाठी जायचे असल्याने शेतकºयांचे प्रश्न मांडण्याची अनुमती मागितली. जिल्ह्यात पाऊस नसल्याने खरिपाची चिंताजनक स्थिती आहे. असे असताना महसूल आणि महावेधच्या नोंदीत फरक येत आहे, असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमाप्रमाणेच नोंदी ग्राह्य धरल्या जातात, याबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी पावसाच्या नोंदीबाबत अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दुष्काळ निधी वाटपात गोंधळ असल्याचे निदर्शनाला आणले.
उजनीच्या पाण्यावर चर्चा सुरू झाल्यावर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार बबनदादा शिंदे यांना लक्ष्य केले. बबनदादांनी माढ्यातील रेल्वे रुळाच्या वरील भाग सुजलाम् सुफलाम् करून घेतला आहे. आता खालच्याही लोकांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे आता उजनीचे पाणी सर्वांना समान मिळावे म्हणून कालव्याच्या शेवटच्या शेतकºयांना पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांना मध्येच अडवत सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आधी तलाव भरून घेतले जाणार आहेत, असे सांगितले. दोन्ही मंत्र्यांची वेगवेगळी उत्तरे पाहून सदस्य आवक झाले. झेडपीच्या शाळांबाबत प्रस्ताव देऊ असे जिल्हाधिकारी म्हणाले.
झेडपीच्या शाळा इमारतीसह वर्ग करा- जलसंधारण तथा सहपालकमंत्री तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेत नियोजन सभा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रत्येक आक्षेपाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना सावरत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उत्तरे दिली. महापालिकेच्या हद्दीतील झेडपीच्या ३७ शाळांची इमारतीची अवस्था वाईट असून शाळा महापालिकेस वर्ग करा अशी सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी केली. त्यावर सहपालकमंत्री सावंत म्हणले, धोकादायक शाळांचा प्रश्न गंभीर असून, डीपीसीचा निधी रस्ते, दिव्यांना न देता शाळांना देऊ अशी भूमिका घेतली. त्यावर देशमुख यांनी धोकादायक शाळा शासन बांधणार असल्याचे सांगितल्यावर असा निर्णय झाला नसल्याचे सावंत म्हणाले.