चैत्री यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे राज्य शासनाने मंदिर उघडण्यास व यात्रेस बंदी घातली आहे. अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पंढरपुरात भाविक आले तर, कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन मंदिर समितीने चैत्री यात्रा प्रतीकात्मक स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत विठ्ठलाचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू आहेत. त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेनुसार येणाऱ्या सर्व दिंड्या व सर्व पायी येणाऱ्या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने कृपया कोणीही पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
त्याचबरोबर चैत्री यात्रेनिमित्त गर्दी हाेऊ नये यासाठी ११०० जणांचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये ५०० पोलीस कर्मचारी, ५०० होमगार्ड, एसआरपी कंपनी, ३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ५ पोलीस निरीक्षक, ५० सहाय्यक पाेलीस निरीक्षक, १५ महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. हा पोलीस बंदोबस्त २० एप्रिल ते २४ एप्रिलपर्यंत राहणार असल्याचे उपविभागीय पाेलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.