चपळगाव : कोरोनाच्या नियमावलीत शिथिलता येताच अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी स्वामी भक्तांसाठी मोफत ऑनलाइन महाप्रसाद बुकिंगची व्यवस्था केली आहे. यांची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.
अक्कलकोटमध्ये येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांसाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १९८८ पासून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या अन्नछत्राचे वटवृक्षात रूपांतर झाले. भक्तांच्या सोयीसाठी रांगेचे नियोजन सुरू झाले. प्रत्येक पंगत संपून पुढची पंगत सुरू होईपर्यंत भक्तांना उभे राहावे लागायचे. या सर्व बाबींचा विचार करून न्यासाने असा निर्णय घेतला की प्रत्येक पंगतीच्या काही जागा राखीव ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग करणा-यांसाठी ठेवाव्यात आणि त्यानुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑनलाइन महाप्रसाद बुकिंगची सोय केली आहे. (वा. प्र.)
ज्यामुळे सर्व स्वामी भक्तांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्यांच्या वेळेचे नियोजन नेमकेपणाने करता येईल, त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळ आणि महाप्रसादाची वेळ यांची सांगड योग्य रीतीने घालता येईल. अशा सर्व बाबींना गृहीत धरून न्यासाच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग सेवेचा लाभ घ्यावेत व या योजनेची माहिती अक्कलकोटास नजीकच्या काळात येऊ इच्छिणाऱ्या स्वामी भक्तांनाही द्यावी, असे भोसले यांनी सांगितले.
सदरचे न्यास हे विविध उपक्रम राबविण्यामध्ये राज्यात अग्रेसर असून, स्वामी भक्तातून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालनदेखील काटेकोरपणे करण्यात येते. कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी न्यासाकडून होत आहे.