दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा, सीना आणि हरणा या तीन नद्या वाहतात. नद्यांच्या परिसरात आठ महिने पाणी उपलब्ध असल्याने बागायत क्षेत्र वाढले आहे. मात्र, गेल्या २० वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी शेती पंपाची वीज बिले भरली नाहीत. त्यामुळे तालुक्याची थकबाकी ३५७ कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणचे विभागीय कार्यालयाचे अधिकारी गावागावांतून ग्राहकांच्या प्रबोधन कार्यक्रमात दिसत आहेत. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील २३ गावांतून ते शेतकरी, घरगुती वीज ग्राहक, औद्योगिक वापर करणाऱ्या ग्राहकांशी संवाद साधत आहेत.
तालुक्यात २७ हजार ४३४ शेतीपंपाचे ग्राहक आहेत. त्यांच्याकडे सप्टेंबर २०२० अखेर ३५७ कोटी ६० लाख रुपये थकबाकी आहे. महावितरणने सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार, त्यावरील व्याज, दंड पूर्णपणे माफ करणारी कृषी धोरण २०२० योजना लागू केली. त्यामुळे २४८ कोटी थकबाकी दिसून येते. व्याज दर १८ टक्क्यांऐवजी ९ टक्के आकारण्यात येणार आहे. ग्राहकांना थकीत वीज बिलाच्या ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. याची माहिती देण्यासाठी गावागावांतून शेतकऱ्यांशी संवाद साधला जात आहे.
वसुलीसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम
वीज बिल वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी गावोगावी जाऊन ग्राहकांचे प्रबोधन करीत आहेत. या माध्यमातून ग्राहकांना विजेचे महत्त्व, वीज बिलात दिली जाणारी सवलत आणि विजेचा वापर किती गरजेचा याविषयी त्यांच्यात जागृती निर्माण केली जात आहे. तसेच तुम्ही विजेचा वापर करता तर मग त्याचे वीज बिल भरायला नको का? असा प्रेमळ सल्लाही दिला जात आहे. त्यास भीमा नदीकाठच्या गावात महावितरणच्या आवाहनाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून चार दिवसांत १ कोटी ६१ लाख यांची वसुली झाल्याचे उपअभियता संजीव कोंडगुळी यांनी सांगितले.
फोटो
१५दक्षिण सोलापूर
ओळी
महावितरणच्या वीज बिल वसुलीला प्रतिसाद देणाऱ्या उमाशंकर पाटील यांचा सत्कार करताना पुणे विभागीय अधिकारी अंकुश नाळे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अधिकारी व्ही. पी. ओव्हाळे, उपअभियंता संजीव कोंडगुळी.