सोलापूर : जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबूज, कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे द्राक्षाची मागणी घटल्याने भाव कमी झाले आहेत.
जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढतच चालला आहे. असह्य उकाड्यामुळे थंडावा देणाऱ्या फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत खरबूज व कलिंगडाची रेलचेल दिसत आहे. जिल्ह्यातील मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण व अक्कलकोट तालुक्यातून कलिंगडची आवक सुरू आहे. बुधवारी २४५ क्विंटल कलिंगडाची आवक झाली. एक हजार ते साडेतीन हजार रुपये असा दर होता. किरकोळ बाजारात साधारणपणे ३० ते १०० रुपये प्रतिनग कलिंगडाची विक्री सुरू आहे. तसेच खरबूजची प्रतिकॅरेट ५०० ते ७५० अशी विक्री झाली आहे. उन्हामुळे या दोन्ही फळांची मागणी वाढल्याचे समरा बागवान यांनी सांगितले.
द्राक्षाची आवक घटली आहे. कलिंगड, खरबूजला मागणी वाढल्याने द्राक्षाचे भाव पडले आहेत. १३ कॅरेट द्राक्षाची आवक झाली. प्रतिदहा किलोस ६०० ते १४०० असा दर मिळत आहे. डाळिंबची आवक कमी झाली आहे. ७३० बॉक्सची आवक झाली. एक हजार ते १५ हजार १०० असा भाव मिळाला. सांगोला, मोहोळ तालुक्यातून येणाऱ्या डाळिंबाची प्रत साधारण आहे. पपईची १५ कॅरेट आवक झाली. भाव ७०० ते १३०० रुपये मिळाला आहे. पेरू ४० कॅरेटची आवक झाली. भाव १ हजार ते अडीच हजार मिळाला आहे.
कोकणाचा राजा दाखल
अक्षयतृतीयेचा सण जवळ आल्याने बाजारपेठेत देवगडचा आंबा दाखल झाला आहे. यंदा आंब्याला डाग असल्याचे दिसत असल्याने ग्राहक आकर्षित झाल्याचे दिसून येत नाही. पण भाव मात्र आवाक्याबाहेरचा दिसत आहे. देवगडची दीड डझनाची पेटी ५०० ते ७०० तर उत्तम प्रतिच्या पाच डझनाची पेटी पाच हजारापर्यंत सांगितली जात आहे. चिकू ७७ क्विंटल दाखल झाले तर दर एक हजार ते २३०० इतका मिळाला आहे.
-----