यशवंत सादुल
सोलापूर : उन्हाळ्याची चाहूल लागली की सर्वसामान्यांचे फ्रीज समजल्या जाणाºया माठाची खरेदी करण्याची लगबग सर्वत्र दिसून येते. सध्या पांढºया रेतीपासून बनविलेले लालभडक माठ डोक्यावर घेऊन तसेच सोलापूरच्या गल्लीबोळात, घरोघरी गुजराती माठांची विक्री करणारे बिहारी बांधवही दिसून येत आहेत.
पारंपरिक माठापेक्षा कमी किमतीत आणि जास्त थंडगार पाणी मिळत असल्याने माठ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. आठवड्यातून तीन हजार माठांची गुजरातमधून येथे आवक होते. बिहारी विक्रेते हे माठ घरोघरी जाऊन विकतात. बिहारमधील पाटणा, मुझ्झफरपूरमधील कुंभार समाजातील शेतकरी असलेले पंधरा ते वीस बिहारी विके्रते मागील दोन वर्षांपासून माठ विकण्यासाठी सोलापुरात येत आहेत. यंदा विजयपूर रोडवर आपला डेरा टाकला आहे. अहमदाबाद (गुजरात) येथून आठवड्यातून एकदा हजार माठ ट्रकने सोलापुरात आणतात. त्यास रंगरंगोटी करून विक्रीसाठी सज्ज करून ठेवतात. चार ते साडेचार किलो वजनाचा एक माठ असतो. एक विक्रेता साधारणत: २० ते २२ माठ घेऊन सकाळी निघतो.
दिवसभर दोन टप्प्यात ४० माठ विकतात. १५० रुपये किंमत असली तरी टिकाऊपणा आणि पाणी थंड होण्याची खात्री कृतीतून पटवून देतात़ पाच ते सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुंबई, भिवंडी, नालासोपारा, घाटकोपर येथे व्यवसायाच्या निमित्ताने आले़ सोलापुरात व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने यंदा परत आल्याचे रामचंद्र पंडित प्रजापती यांनी सांगितले.
कर्नाटकातील विजयपूरपर्यंत विक्रीसाठी जात आहेत. उन्हाळा संपला की परत गावाकडे जाऊन शेती, कुंभारकाम करतात. यंदा संजय प्रजापती, सुरिंदर पंडित प्रजापती, विश्वनाथ पंडित, रामचंद्र पंडित,अनिल पंडित यांच्यासह १५ ते २० विके्रते आले असून, गुजराती माठांसोबत पुढच्या वर्षी वजनाने हलके, फक्त मातीचे असणारे, कलाकुसरीच्या राजस्थानी माठ विक्रीसाठी आणणार असल्याचे रमेश शाह प्रजापती यांनी सांगितले.
आठवड्यातून एकदा अडीच ते तीन हजार माठ गुजरातहून येतात़ ते फुटू नयेत म्हणून त्यास गवताचे आवरण असते. तरीही वाहतूक करताना किमान २५ ते ३० टक्के माठ फुटतात. सोलापुरातील ग्राहकांना घरपोच सेवा दिली तरी भाव कमी करण्याची मानसिकता असल्याने वाजवी किमतीत सरासरी दीडशे रुपयांना एक याप्रमाणे विक्री केली जाते.
वाळूमुळे टणकपणा- गुजरातमध्ये नदीच्या पांढºया वाळूपासून माठ बनवितात.त्यात फक्त पंचवीस टक्के मातीच असते़ वाळूमुळे माठ टणक बनून टिकाऊ राहतात़ हाताळताना फुटण्याची शक्यता कमी असते.
पाणी झिरपण्यासोबत कमी वेळेत जास्त थंड होते. इतर माठांच्या तुलनेत कमी किमतीमुळे ग्राहकांच्या पसंतीस पडत आहेत़ येथील प्रतिसादामुळे पुन्हा सोलापुरात आलो आहोत़- संजय प्रजापती,विके्रते