चपळगाव : अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूरचे धरण अलीकडे दुर्मिळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरत चालले आहे. धरणावर अनेक दिवसांपासून दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेले पक्षी वास करीत असतानाच त्यात आणखी भर पडली आहे. बार हेडेड गुज (पट्टकदंब) आणि आॅस्प्रे या जातीच्या दुर्मिळ परदेशी पक्ष्यांचे भर हिवाळ्यात कुरनूर धरणावर आगमन झाले आहे.सोलापूर जिल्ह्यात कुरनूर धरणावर या पक्ष्यांचे मोठे वास्तव्य झाल्याचे नेचर कॉन्झर्व्हेशनचे शिवानंद हिरेमठ यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मध्यम आकारातील हंस पक्षी म्हणून ओळखला जाणारा सुंदर असा पट्टकदंब कुरनूर भेटीला आला आहे.
याव्यतिरिक्त ग्रेटर फ्लेमिंगोंचेही (रोहित) आगमन झाले आहे. सध्या जवळपास २५ पट्टकदंब आणि ८ रोहित पक्षी धरणावर आले आहेत.
आॅस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील कुरनूर धरणावर पोहोचला आहे. त्याचे आवडते खाद्य मासे आहे. हा एक विश्वव्यापी पक्षी असून, याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नाही. यापूर्वी सलग तीन वर्षे तो कुरनूर धरणावर आढळला आहे. या वर्षी पुन्हा त्याचे आगमन झाले असून वास्तव्य वाढत चालले आहे.
धरण परिसरातील जुन्या बावकरवाडी गावातील पडकी घरे, शेतात मिळणारे खाद्य, धरणाची पोषक भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्त स्वरूपातील मैदानी प्रदेशांमुळे कुरनूरचे धरण दुर्मिळ पक्ष्यांचे माहेरघर बनत चालले आहे.
धरणावर पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे- हन्नूर येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ भरमशेट्टी यांनी कुरनूर धरणावर पक्षी निरीक्षण केंद्र स्थापन करण्याची मागणी केली आहे. येथील भौतिक व भौगोलिक परिस्थिती पाहुण्या पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी समृद्ध आहे. येथे पक्षी निरीक्षण केंद्रासह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात पर्यटनासाठी वाव मिळेल. नवा रोजगार निर्माण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हंस येतो माऊंट एव्हरेस्ट ओलांडून- साधारण ७५ सेंटिमीटर आकाराचा हा हंस पक्षी आहे. याला बार हेडेड गुज तसेच आपल्याकडे पट्टकादंब असे म्हणतात. जगातील सर्वात उंचीवरून म्हणजे माउंट एव्हरेस्ट ओलांडून स्थलांतर करून येतात. यांचा आढळ मध्य आशिया येथे आहे. हवा थंड आणि दाट असते तेव्हा हे पक्षी रात्री उड्डाण करतात. प्रवासादरम्यान आकाशातील ग्रह-ताºयावरून ते आपली दिशा ठरवितात. डोळ्यावर दोन काळे आडवे पट्टे आणि पाय पिवळे असतात.