साेलापूर : काेराेनाच्या विषाणूने पुन्हा शहर आणि ग्रामीण भागात शिरकाव केला आहे. शहरात दीड महिन्यानंतर एक रुग्ण आढळून आला आहे. हे रुग्ण म्हणजे एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅक्टर आहेत. ग्रामीण भागात तीन रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई, पुण्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे वृत्त आहे. राज्य सरकारने अलर्ट दिला आहे. शहरात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात काेराेनाचा उद्रेक झाला हाेता. यानंतर स्थिती नियंत्रणात आहे. दीड महिन्यापूर्वी एक रुग्ण आढळून आला हाेता. हा रुग्णही चारच दिवसांत बरा झाला. खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅक्टरांची आराेग्य तपासणी आणि काेराेना चाचणी झाली. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याचे पालिकेला कळविण्यात आले.
ग्रामीण भागात शनिवारी १४५ चाचण्या झाल्या. यातून तीन रुग्ण आढळून आले. यात दाेन पुरुष, तर एका महिलेचा समावेश आहे. ग्रामीणमध्ये शुक्रवारी दाेन रुग्ण आढळून आले. यामुळे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्णांची संख्या पाच झाली आहे.
---
रॅपीड नकाे, आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना काेराेनाच्या आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे आदेश आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लोहारे आणि डाॅ. शीतलकुमार जाधव यांनी दिले आहेत. काेराेनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची रॅपीड ॲन्टिजन टेस्ट करू नका. आरटीपीसीआर करण्यावरच भर द्या, असा निराेप आहे. मनपा आराेग्य केंद्रात दरराेज २०ते ३० चाचण्या व्हाव्यात, असे आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश आहेत.
--
बार्शी तालुक्यात दाेन रुग्ण
ग्रामीणमध्ये पाच सक्रिय रुग्ण आहेत. यात बार्शी तालुक्यात दाेन, मंगळवेढा, माेहाेळ, दक्षिण साेलापूर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे. अक्कलकाेट, करमाळा, माढा, माळशिरस, उत्तर साेलापूर, पंढरपूर, सांगाेला तालुक्यात शनिवारअखेर एकही रुग्ण नव्हता.
--
शहरात दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी
शहरात काेराेना लसीचा पहिला डाेस घेण्याचे सरासरी प्रमाण ८४ टक्के आहे. यात ४५ ते ५९ वयाेगटातील ८० टक्के, ६० वर्षांवरील ७० टक्के, १४ ते ४४ वयाेगटातील ८५ टक्के, १५ ते १७ वयाेगटातील ५५ टक्के, तर १२ ते १४ वयाेगटातील ५६ टक्के मुलांचा समावेश आहे. दुसऱ्या डोसचे सरासरी प्रमाण ६३ टक्के आहे. यातही ४५ ते ५९ वयाेगटातील ६४ टक्के, ६० वर्षांवरील ५६ टक्के, १८ ते ४४ वयाेगटातील ६७ टक्के, १५ ते १७ वयाेगटातील २९ टक्के, तर १२ते १४ वयाेगटातील २० टक्के मुलांचा समावेश आहे. दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढविण्यासाठी पालिका ‘हर घर दस्तक’ देऊन डाेस न घेणाऱ्या नागरिकांना प्रवृत्त करणार आहे, असे आराेग्य अधिकारी डाॅ. बसवराज लोहारे यांनी सांगितले.