कला ही मनुष्याला मिळालेली सर्वश्रेष्ठ देणगी आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये कोणती ना कोणती कला असतेच. ती कला ओळखता आली पाहिजे. यासाठी आई-वडिलांचा आशीर्वाद आणि गुरूंचे मार्गदर्शन ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. जो स्वत:ला ओळखत नाही. कला विकसित करत नाही. त्याच्यातील कला विकसित होतात.
एक काळ असा होता कलाकारांना राजाश्रय मिळायचा. त्यांना संगीताची साधना करण्याशिवाय इतर दुसरं कोणतंच काम नसायचं. संसाराची कसलीच चिंता त्यांना नसायची. संसारात असणाºया आवश्यक सर्व गोष्टी राजाकडून पूर्ण केल्या जायच्या. त्यामुळे संगीताची उत्तम साधना त्यांच्याकडून होत असे. संगीत साधनेच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची संधी त्यांना मिळत असे. संगीताचा सर्वोच्च आनंद स्वत: घेत असत. राजाला देत असत.त्याबरोबरच जनतेलाही आनंद मिळवून द्यायला ते समर्थ असत.
आजच्या कलावंतांची स्थिती वेगळी आहे. लोकशाहीमध्ये संगीताची कदर असणारी मंडळी कमी आहेत. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचे कलावंतांकडे लक्ष असणे आवश्यक आहे. शास्त्रीय संगीत जगातल्या प्रत्येक माणसाला अत्यावश्यक आहे. हे संगीत मनाची शक्ती वाढवण्याचे काम करते. शरीराची व्याधी नष्ट करते. मनाचा गोंधळ कमी करते. मनाची वाटचाल योग्य दिशेने घडवते. लहान मुलांची निरागसता संगीत क्षेत्रातल्या कलाकारांमध्ये पाहायला मिळते.
जगामध्ये घडणाºया वाईट गोष्टींमध्ये कलावंत आपल्याला दिसणार नाहीत. मग तो कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम ते करीत असतात. ज्याच्या आयुष्यामध्ये संगीत नाही त्याचे आयुष्य निरस आहे. मनुष्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत संगीताशिवाय आनंदाने जगू शकत नाही. बालकाच्या जन्माच्या आनंदापासून त्याच्या मृत्यूच्या दु:खापर्यंत संगीत असतेच. प्रत्येकाच्या मंगलप्रसंगी, दु:खद प्रसंगी संगीत असतेच. संगीत मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये ताल असतो, लय असते. ती लय कमी किंवा जास्त झाली की शरीराची अवस्था बिघडते. ती लय योग्य दिशेने असेल तरच जीवन सुरळीत असते.
त्यामुळे हिंदुस्थानी संगीताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषत: भारतीय शास्त्रीय संगीताची शक्ती पाश्चात्य देशांनी ओळखली आहे. ते भारतातील सर्व नामवंत, प्रतिष्ठित कलावंतांना आपल्या देशामध्ये बोलावतात. भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार जगातल्या सर्व देशांमध्ये सुरू आहे. भारतीय संगीताचा आनंद ते घेत आहेत. भारतीय कलावंतांना ते मान आणि धन देत असतात. मनाची शांती मिळवत असतात.
आपल्या देशात परिस्थिती नेमकी वेगळी आहे. शास्त्रीय संगीताला राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत चाललेला आहे. या कलावंतांची साधना कितीही असली तरी याचा आनंद घ्यायला आपण तयार नाही. त्यामुळे कलाकारांचे व्यक्तिगत जीवन दयनीय असल्याचे जवळून पाहिले आहे. भारतीय कलावंतांना मुखाने दाद दिली जाते. टाळ्या वाजवल्या जातात; मात्र त्याचं पोट भरतं का याचा विचार आपण करायला तयार नाही. अनेक नामवंत कलावंतांचा शेवटचा काळ अतिशय दयनीय अवस्थेत गेलेला आहे. भारतामध्ये एक नामवंत कलावंत होऊन गेले. त्यांची कला ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमत असत. त्यांना वृद्धापकाळ आल्यानंतर ती कला सादर करू शकत नव्हते. त्यावेळी मात्र समाजाने त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष केले.
अन्नान्नदशा होऊन ते स्वर्गवासी झाले. त्यांचा हा शेवटचा काळ लोकांनी पाहिला नाही.अनुभवला नाही. ते गेल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकत्रित येऊन त्यांच्याविषयी काही चांगले काम करायचे ठरवले. त्यासाठी खूप मोठा निधी जमा झाला. आपल्याकडे माणूस गेल्यानंतर त्याचे महत्त्व कळते. त्यानंतर आपण जागे होतो.ते जिवंत असताना त्यांच्या वृद्धापकाळी ते कला सादर करत नसताना त्यांची काय अवस्था असते याकडे आपले लक्ष नाही.
आज अनेक मान्यवर, बुजुर्ग कलावंत कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपडतात. कार्यक्रम मिळाला तरी त्यांना योग्य मानधन मिळेलच असे नाही. यासाठी अशा मान्यवर कलावंतांना शासनाने योग्य मानधन योजना सुरू करण्याची गरज आहे. आज खेदाने सांगावेसे वाटते. संगीतामध्ये पद्मविभूषण पदवी असलेले कलाकार आहेत. त्या कलाकाराचा नातू आज एका कंपनीमध्ये कामाला जातो. तो चांगला कलावंत आहे. केवळ या कलेने पोट भरणार नाही म्हणून तो कंपनीत कामाला जातो. असे अनेक कलावंत आहेत. त्यांच्यासाठी राजाश्रय मिळणे गरजेचे आहे. तरच भारतीय संगीत हे टिकणार आहे,त्याचा आनंद आपणा सर्वांना घ्यायला मिळणार आहे. संगीतामध्ये प्रचंड शक्ती आहे. ही शक्ती आपण सर्वांनी अनुभवावी. हीच अपेक्षा. धन्यवाद. - डॉ. अनिल काशिनाथ सर्जे(लेखक हे संगीत क्षेत्रातील अभ्यासक आहेत.)