मोडनिंब : कोरोनाची धास्ती घेत मोडनिंब कला केंद्रातील कलावंतही आता गावाकडे जाऊ लागले आहेत़ कारण सध्या कला केंद्राकडे कोरोनाच्या भीतीने रसिकांनीही पाठ फिरविली आहे़ त्यामुळे कलावंतांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील शाळा, महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे़ याची दखल कला केंद्रातील कलावंतांनीही घेतली आहे़ सावधानतेचा इशारा म्हणून मोडनिंब येथील कला केंद्रातील अनेक कलावंत आपल्या गावी जात आहेत.मोडनिंब येथे पाच लोकनाट्य कला केंद्रे आहेत़ या सर्व कला केंद्रांमध्ये ४०० च्या आसपास कलावंत आहेत़ मोडनिंबच्या या कलावंतांची कला पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक रसिक हौसेने मोडनिंबला येतात मात्र कोरोनाच्या धास्तीने रसिकांनीच पाठ फिरविल्याने गर्दी कमी होऊ लागली़ थिएटरमधील कलावंतांनी घरी जाणे पसंत केले.
वैशाली काळे म्हणाल्या, आमचे सर्व कलाकार कोरोनाच्या भीतीमुळे घराकडे जाणे पसंत करू लागले तर अनेक कलावंत, ढोलकीवादक, पेटी आणि तबलावादक यांची शाळेमध्ये असणारी मुले शाळांना सुटी असल्यामुळे घरी आलेली आहेत़ आपल्या मुलाबाळांसह राहावे असे कलावंतांनाही वाटू लागले आहे़ त्यामुळे हे कलाकार गावी निघाले.
नटरंग व राधिका कला केंद्राचे मालक किसनआप्पा जाधव यांना विचारले असता कलावंतांनी आपापल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्यास तत्काळ दुजोरा दिला आहे. कोरोनाचे सावट कमी होताच पुन्हा पूर्ववत कलाकेंद्रे सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले.