बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : श्री मार्कंडेय जयंतीनिमित्त पूर्व भागात २७ जानेवारी रोजी सकाळी साडेतीनशेहून अधिक ठिकाणी श्री मार्कंडेय मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ पूर्व भागातील विविध मूर्तिकारांकडे सध्या मार्कंडेय मूर्ती तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे़ मूर्तींचे काम शेवटच्या टप्प्यात सुरु आहे़ तसेच अनेक संस्था, संघटना तसेच मंडळांच्या वतीने पूर्वभागात अन्नदान कार्यक्रमाचेही नियोजन सुरु आहे़ एक लाखाहून अधिक भक्तांना अन्नदान करण्यात येणार आहे़ अनेक मंडळांकडून रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे़ तर काही मंडळांकडून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन सुरु आहे.
श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात बुधवारी, २२ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे़ मार्कंडेय मंदिरात तब्बल अडीच हजार ज्योती प्रज्वलित करून मार्कंडेय महामुनींची आरती करण्यात येणार आहे़ मार्कंडेय जयंतीनिमित्त गेल्या तीन वर्षांपासून मार्कंडेय मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम आयोजिला जात आहे़ या दीपोत्सवात समाजबांधव उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे नितीन मार्गम यांनी केले आहे़ शुक्रवारी पहाटे मार्कंडेय रुद्राभिषेक कार्यक्रम होणार आहे़ त्यानंतर मार्कंडेय दीक्षा घेतलेल्या बांधवांकडून अन्नपूजा करण्यात येणार आहे, असेही मार्गम यांनी सांगितले.
पन्नास मंडळांची नोंदणी- निरंजन बोद्धूल- अधिक माहिती देताना महर्षी मार्कंडेय जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी सांगितले, सोलापूर शहर- परिसरात तब्बल साडेतीनशेहून अधिक ठिकाणी श्री मार्कंडेय महामुनी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ सध्या पन्नास मंडळांनी आमच्याकडे नोंदणी केलेली आहे़ नोंदणी प्रक्रिया २६ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे़ या सर्व मंडळांवर मध्यवर्ती महामंडळाकडून देखरेख करण्यात येणार आहे़ मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा शिस्तप्रिय आणि शांततेत व्हावा, याकरिता महामंडळ प्रयत्नशील आहे़ याबाबत सर्वांना मार्गदर्शनदेखील करण्यात येत आहे़ महामंडळाच्या वतीने साडेसहा फूट उंच मार्कंडेय मूर्तीची प्रतिष्ठापना पार्क चौकात करण्यात येणार आहे़ ही सर्वात मोठी मूर्ती असणार आहे़ प्रसिद्ध मूर्तिकार राजू गुंडला यांनी ही मूर्ती तयार केली आहे़ २६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता सोलापुरातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ होणार आहे़ जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम राबवून मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा साजरा करावा, असे आवाहन बोद्धूल यांनी केले़
गुरुवारी पालखी मिरवणूक- श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त कुचननगर येथील जय मार्कंडेय प्रतिष्ठानच्या वतीने यंदा ७५ मार्कंडेय मूर्तींचे वाटप करण्यात येणार आहे़ जय मार्कंडेय प्रतिष्ठानचे प्रमुख लक्ष्मीकांत अवधूत यांच्या खर्चातून यंदा ७५ मार्कंडेय मूर्तींचे वाटप होणार आहे. पहिल्या वर्षी २१ त्यानंतर दुसºया वर्षी ५१ मूर्तींचे वाटप त्यांनी केले़ तसेच त्यांच्या पुढाकारातून कुचननगर परिसरात पाच दिवस मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा नियोजित आहे़ २३ तारखेला दत्तनगर येथील दत्तमंदिरातून श्री मार्कंडेय पालखी मिरवणूक निघणार आहे़