सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. याचा लाभ सोलापुरातील लाखो शेतकऱ्यांना मिळाला आहे. सोलापुरात एकूण सहा लाख लाभार्थी असून, यापैकी तीन लाख २४ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत केवायसी अर्थात आधार लिंक करून घेतले. उर्वरित पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांना सन्मान निधीपासून वंचित राहावे लागले आहे.
आधार लिंक करून घेण्याबाबत प्रशासनाने अनेकदा आवाहन केले. यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळेना. दुसरीकडे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला सन्मान निधी परत मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
प्रशासनाच्या चुकीमुळे नोकरदार असलेल्या करदात्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर १४ कोटी ६३ लाख रुपये पंतप्रधान कृृषी सन्मान योजनेंतर्गत जमा झाले. ही भानगड प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर वसुलीची मोहीम सुरू झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, वसुली करायची कोणी?, हा प्रश्न कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
------------
कृषी अन् महसूलमध्ये विभागात मतभेद
प्रशासनाच्या कारकीर्दीत कृषी आणि महसूल विभागात पहिल्यापासून मतभेद आणि मनभेद आहेत. दोघेही राज्य शासनाकडून आलेली जबाबदारी एकमेकांवर ढकलतात. अशीच काहीशी स्थिती पंतप्रधान कृषी सन्मान योजनेबाबत झाली आहे. या मतभेदामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचेही सांगण्यात आले.
---------
वसुलीचा तपशील असा
जिल्ह्यात एकूण सोळा हजार १४ करदाते शेतकरी आहेत. यातील पंधरा हजार ७७९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ कोटी ६३ लाख रुपये जमा झाले. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ७३ हजार हप्ते जमा झाले आहेत. ३९ हजार ४४९ करदात्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सात कोटी एकूण ९० लाख रुपये अनुदान परत केले आहे. उर्वरित शेतकऱ्यांकडून जवळपास सात कोटी रुपये येणे बाकी आहे.
-------------
आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान निधीअंतर्गत केंद्र सरकारतर्फे लाभ देण्यात येत आहे. एप्रिल २०२२नंतरच्या लाभासाठी नोंदणीकृत लाभार्थ्यांनी बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे.
- शमा पवार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा पीएम किसानच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी