शितलकुमार कांबळे, सोलापूर : आयपीएल (इंडियन प्रिमियर लीग) च्या फायनलमध्ये जितके षटकार लागतील तितकी झाडे लावण्याचा मानस क्रिकेट व निसर्गप्रेमींनी व्यक्त केला होता. त्यानुसार फायनलमध्ये १९ षटकार लागल्यामुळे 19 झाडे बंकलगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे लावण्यात आली.
आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) वेड हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आहे. या लोकप्रियतेचा फायदा हा पर्यावरणासाठी करण्याचा प्रयत्न काही निसर्गप्रेमींनी केला. सोमवारी रात्री चैन्नई सुपरकिंग्ज व गुजरात टाईटन्स या दोन संघात १९ षटकार लागले. गुजरातच्या संघाने ९ तर चैन्नईच्या संघाने १० षटकार मारले. त्यामुळे बंकलगी येथे १९ झाडे लावण्यात आली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे निसर्गप्रेमींनी हा उपक्रम घेतला. भीमसेन लोकरे, श्रीकांत बनसोडे या तरुणांसोबत गावकरीही या उपक्रमाला साथ दिलीत. गावातील श्री हनुमान विद्यामंदिर व जिल्हा परिषद शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. विजू नागमोडे यांच्या हस्ते उपक्रमाचे उट्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रान सगरे होते. यावेळी एन. के. कोणदे, औदुंबर गेजगे, नागनाथ बनसोडे, नागनाथ वाघमारे, शशिकांत बनसोडे, संतोष कांबळे आदीउपस्थित होते.