सोलापूर : वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील बस स्टॅन्डच्या बाजूस असलेल्या बंद जुन्या शासकीय रुग्णालयातील पडक्या मोकळ्या जागेत गोलाकार रिंगण करून पैशाची पैज लावून काही जुगारी मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे शनिवारी दुपारच्या सुमारास उत्तर तालुका पोलिसांनी छापा घालून १९ जणांना ताब्यात घेतले. उत्तर तालुका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्या तीन व्यक्तींनी तेथून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत जुगार खेळणाऱ्या व्यक्तींकडून रोख रक्कम २९ हजार, मोबाइल, दुचाकीसह एकूण ४ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई उत्तर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी नान्नज बीटचे पोलीस अशोक खवतोडे, कॉन्स्टेबल देवकर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गजानन स्वामी, पोलीस नाईक कोळेकर, मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल सोलंकर यांच्या वतीने करण्यात आली. याबाबत पोलीस अशोक अवताडे यांनी उत्तर तालुका पोलिसांत फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.आय चव्हाण करत आहेत.