सोलापूर: अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सांगोल्यात धाडी टाकून पाच पान टपऱ्यांवर केलेल्या कारवाईत दहा हजारांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर अनेक चालकांनी पानटपरी बंद करून तेथून धूम ठोकली. ही कारवाई गुरुवारी सांगोला शहरात महात्मा फुले चौक व अहिल्यादेवी चौकात झाली. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका घेऊन सांगोला शहरातील सर्वच पान टपरी सायंकाळी उशिरापर्यंत बंद असल्याचे चित्र दिसून आले.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे (रा. सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी पानटपरी चालक युवराज गजानन झुरळे, योगेश महादेव मिसाळ दोघेही (रा.सांगोला), सिद्धेश्वर पांडुरंग पांढरे, अमोल सुभाष कमले, सतीश प्रभाकर सासणे (तिघेही रा. सनगर गल्ली, सांगोला), पुरवठादार निशांत मिसाळ (रा. सांगोला) यांच्या गुन्हा दाखल झाला आहे. अन्नसुरक्षा अधिकारी उमेश भुसे, आर. आर. पाटील, अस्मिता टोणपे यांच्या पथकाने ही कारवाई केली.