सोलापूर : लेक म्हणजे परक्याचं धन. लग्न झाल्यावर एकेदिवशी भुर्रदिशी उडून जाईल असं अनेकांची धारणा. सोलापुरात अशाच एका कुटुंबामध्ये लेकीचं लग्न जमल्यानं मोठ्या उत्साहानं घराला रंग देण्याचं काम काढलं, पिता उल्हासानं शिडीवर चढून रंग देताना खाली पडून जायबंदी झाला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जनार्दन नारायण यादगिरी (वय- ७६) असे जखमी पित्याचे नाव आहे.
सोलापुरातील विडी घरकुल, कुंभारी परिसरात जनार्दन नारायण यादगिरी (वय- ७६) हे कुटुंब वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीचं लग्न जमले असल्यामुळे सारेच कुटुंब आनंदात होते. पै पाहुणे येणार म्हणून घराला रंग देण्याची धांदल रविवारी सुरु होती. वृद्ध पिता जनार्दन हे शिडीवर चढून रंग देत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि खाली पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. पाठीला मुका मार लागला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सारेच घाबरले. तातडीने मुलगी राजश्री नल्ला हिने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्णाची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.