सोलापूर: कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने संपूर्ण कुटुंबिय कॉरंटाईन झाल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानेसोलापूर महानगरपालिकेतील आशा वर्करचे घर फोडून पावणेदोन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही चोरी २७ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली.
सोलापूर महानगरपालिकेत आशा वर्करला कोरोनाची बाधा झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आशा वर्करसह त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना केगाव येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात कॉरंटाईन करण्यात आले होते़ घरातील सर्व सदस्य कॉरंटाईन झाल्यामुळे शिवाजीनगर येथील घराला २३ जून रोजी कुलुप लावण्यात आले होते.
चोरट्याने या संधीचा फायदा घेत, बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १ लाख ७८ हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ २७ जून रोजी शेजाºयांना घराचे कुलूप तुटून पडल्याचे निदर्शनात आले. शेजाºयांनी तात्काळ याची माहिती आशा वर्करच्या पतीला फोनवरून दिली. आशा वर्करच्या पतीने घरी येऊन पाहणी केली असता आतील कपाटामध्ये ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी सुनिल मुरलीधर सुरवसे (वय-५५) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने करीत आहेत. -चोरीला गेलेले दागिने...- कपाटात पंचवीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, दहा हजार रुपये किमतीचे झुबे, ६० हजार रुपये किमतीची अंगठी, ४६ हजार रुपये किमतीच्या अंगठ्या, पंचवीस हजार रुपये किमतीचे लॉकेट, चांदीचे पैंजण, अंगठी, जोडव्या, चांदीची वाटी, फुलपात्र, चमचा असा एकूण १ लाख ७८ हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने होते.