मयूर गलांडे
मुंबई/सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यात आशा वर्करच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. हर्षल निवृत्ती चव्हाण, असे या मुलाचे नाव असून सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक कार्यकारी अभियंता (गट अ) पदाची परीक्षा त्याने पास केली आहे. हर्षलच्या या यशाबद्दल ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले. निवृत्ती यांना आनंद देणारा हा निकाल 19 एप्रिल रोजी जाहीर झाला आहे.
बार्शी तालुक्यातील कव्हे या गावात राहणाऱ्या हर्षलने प्रतिकुल परिस्थितीतून हे यश प्राप्त केलंय. त्यामुळे, त्याच्या यशाचे गावस्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे. हर्षलचे वडिल शेतकरी असून त्याची आई संगिता या गावातील आरोग्य उपकेंद्रात आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. तर, गावातच असलेल्या शेतीत राबून वडिलही कुटुंबाची उदरनिर्वाह चालवतात. आपल्या मुलाने शिकून-सवरुन मोठं व्हावं, हेच ध्येय या माता-पित्याने बाळगलं होतं. त्यामुळेच, आपल्या दैनंदिन परिस्थितीचा सामना करतानाही, या आई-वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी कधीही मागे-पुढे पाहिलं नाही. तर, हर्षलही लहानपणापासूनच शाळेतील हुशार विद्यार्थी राहिला आहे.
हर्षलने मोहोळ तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयातून पूर्ण केल्यानंतर पुढील इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी हर्षलने पुणे गाठले. पुण्यातील ऑल इंडिया कॉलेज श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथून हर्षलने आपले सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, स्पर्धा परीक्षेची तयारी त्याने सुरू केली होती. सरकारी नोकरीचे ध्येय बाळगून एमपीएससी परीक्षेत हर्षलने जिद्दीने यश मिळवले.
हर्षलने 2017 मध्ये सहायक कार्यकारी अभियंता (गट अ) जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2018 मध्ये सहायक कार्यकारी अभियंता (गट अ) सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे, या दोन्ही परीक्षेत हर्षला यश मिळाले असून दोन्ही पदासाठी त्याची नियुक्ती झाली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागात जाण्याचा निर्णय हर्षलने घेतला आहे. एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी. तसेच, अभ्यासात सातत्य ठेऊन चिकीटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असे हर्षलने म्हटले आहे. तसेच, स्पर्धा परीक्षेतील सिनियर मित्र आणि दिनेश नाईकनवरे सरांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन वेळोवेळी लाभल्याचेही हर्षलने सांगितले.