सोलापूर - मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पंढरपुरात आषाढी वारीची शासकीय पूजा मुख्यमंत्रांना करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर जिल्हाभर ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे, एसटी ची तोडफोड झाली. काही मंत्र्याना आंदोलनकर्त्यांनी घेराव ही घातला होता. यामुळे बिघडलेली परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे शासकीय महापूजेसाठी येणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्यातील बहुतांश मंत्र्यांनी पंढरपूरला जाणे टाळले व पाठ फिरवली. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर एवढेच मंत्री हे सध्या पंढरपुरात आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येतात. यामध्ये सर्वसामान्य भाविकांबरोबरच महत्वाच्या व्यक्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी पोलिसांवर सुरक्षेचा मोठा ताण असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय महापूजेला येऊ नये, अशी भूमिका घेत मराठा समाजातील आंदोलकांनी आंदोलन तीव्र केले. मराठा समाजाचे तीव्र झालेले आंदोलन पाहता अनेक मंत्र्यानी पंढरपूरला यायचे टाळले. त्या मुळे पंढरपुरातील बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पंढरपुरात सध्या 10 लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत दर्शनासाठी वारकर्यांनी मोठी गर्दी केली आहे सध्या दर्शन रांगेत 80 ते 90 हजार भाविक असून दर्शनासाठी 15 ते 16 तास लागत असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे