सचिन कांबळे
पंढरपूर : वारकऱ्यांचे संकट दूर कर. चांगला पाऊस पडू दे. शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे. देशातील प्रत्येक घटक सुखी होऊ दे. या व्यतिरिक्त आपण देवाला काही मागत नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विठ्ठलाची शासकीय महापूजा झाल्यानंतर मानाचे वारकरी बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पालक मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर, भरतशेट गोगावले, आ. समाधान आवताडे, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, ॲड. किर्तीपाल सर्वगोड उपस्थित होते.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, वारी हा आनंदाचा दिवस आहे. सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळालं आहे. ही पांडुरंगाची कृपा आहे. मागील वर्षापेक्षा वारकऱ्यांची संख्या ३० टक्के अधिक वाढली आहे. अनेक योजना नागरिकांना दिल्या आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करत आहेत. मंदिर समितीने केलेल्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे.
भाविकांना योग्य सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे तिघे पंढरपूर येथे मुक्कामी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.