पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा आषाढी सोहळा उद्या होणार आहे. विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाची आस घेऊन पंढरपुरात राज्यभरातून पालख्या, वारकरी, भाविक दाखल झाले आहेत. दरम्यान, पंधरा लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झाल्याची प्राथमिक माहिती सोलापूर ग्रामीण पेालिसांनी वर्तविली आहे. ६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखी तळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.
उद्या आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. पंढरपूर शहरातील सर्व मठ, लॉज, भक्त निवास भाविकांनी फुल्ल झाले आहेत. तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करण्यासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली असून चंद्रभागा तीरावर भाविकांची सर्वात जास्त गर्दी दिसून येत आहे. त्याचबरोबर विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग १० पत्राशेड पूर्ण करून गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करीत आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून अतिरिक्तपणे नियोजन करण्यास मोठी गती देण्यात आली आहे. पाणी, स्वच्छता, निवारा अन् आवश्यक त्या सेवासुविधा भाविकांना पोहोचविण्यात जिल्हा व पोलिस प्रशासनाला यश येत आहे.