सोलापूर: लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त येणाºया भक्तगणांसाठी सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ सज्ज झाले आहे. यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून ३ हजार ७८१ बसेसचा ताफा तैनात केला आहे. प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून पंढरपूर शहराच्या आजूबाजूला चार बसस्थानकांची सोय करण्यात आली आहे. शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच बसस्थानकांवर यंदा प्रथमच सीसी कॅमेरे बसवण्यात येत असून त्याद्वारे नजर राहणार आहे.
आषाढी वारीसाठी सहा प्रदेशनिहाय नियोजन आखले आहे. त्यात औरंगाबाद प्रदेशातून १०७०, मुंबई २८४, नागपूर १३०, पुणे १००७, नाशिक ७५०, अमरावती ५४० अशा गाड्यांचे नियोजन आखले आहे. राज्यातून विविध विभागातून येणाºया बसेसच्या नियोजनासाठी पंढरपूर येथे चार बसस्थानके उभारली आहेत. यात मोहोळ रोडवर भीमा बसस्थानक, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चंद्रभागा बसस्थानक , टेंभुर्णी रोडवर विठ्ठल कारखाना बसस्थानक आणि सांगोला रोडवर पांडुरंग बसस्थानक अशी रचना केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २०० वाहतूक पर्यवेक्षक, विविध प्रदेशचे ८ अधिकारी, ११० यांत्रिकी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय नियोजनासाठी क्रेन, जनरेटर, रुग्णवाहिकांचीही सुविधा उपलब्ध केली आहे. दूरवरून येणाºया प्रवाशांच्या सोयीसाठी परतीच्या प्रवासाची सेवाही उपलब्ध केली आहे.
नियोजनाच्या दृष्टीने आखलेल्या चारही बसस्थानकांपैकी भीमा बसस्थानकावरून मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांसाठी बसेस सुटतील. विठ्ठल बसस्थानकावरून नाशिक प्रदेशच्या विभागातील सर्व गाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. पांडुरंग बसस्थानकावरून कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी याशिवाय मंगळवेढा, सांगोल्याकडे जाणाºया गाड्या सुटतील. शहरातील चंद्रभागा बसस्थानकावरून पुणे, मुंबई, सातारा या मार्गावरील गाड्या सुटणार आहेत. वारीच्या काळात नियमित बसस्थानक चंद्रभागा स्थानकावर वर्ग करण्यात येणार आहे.
सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्या नियोजनाखाली राज्यातून येणाºया प्रवाशांना तत्पर सेवा मिळावी, या अनुषंगाने परिवहन महामंडळाने चोख नियोजन आखले आहे. प्रवाशांना काही समस्या निर्माण झाल्यास चारही बसस्थानकांवर परिवहनच्या चौकशी कक्षातून माहिती आणि मदत मिळू शकेल.
सोलापूर आगाराचे १५ लाखांचे उद्दिष्ट- आषाढी वारीद्वारे गतवर्षी सोलापूर आगाराने २६ बसेसद्वारे १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. पंचमी ते पौर्णिमा अशा १० दिवसात २१ हजार प्रवाशांनी सोलापूर आगाराच्या बसेसच्या सुविधेचा लाभ घेतला होता. त्याच धर्तीवर यंदा ४० गाड्या दिमतीला ठेवण्यात आल्या आहेत. याद्वारे १५ लाख रुपये उत्पन्नाचे उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचे आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यात ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यापासून म्हणजे १६ ते २८ जुलैपर्यंत ही जादा गाड्यांची सुविधा सुरू होणार आहे.
११ ठिकाणी चेकपोस्ट राज्यातून पंढरीकडे मार्गक्रमण करणाºया बसेसच्या तपासणीसाठी महामंडळामार्फत ११ ठिकाणी चेकपोस्ट निर्माण केले आहेत. यामध्ये वेळापूर, महूद, करमाळा, सांगोला, साळमुख, वेणेगाव, शेटफळ, मोहोळ, सिंदफळ, येरमाळा, ढोकी यांचा समावेश आहे. या यंत्रणेसाठी १०८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर प्रत्येक पाळीत ३ याप्रमाणे ९ कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये या ठिकाणी कार्यरत असतील.
ठिकठिकाणी मार्गदर्शक सूचनापरगावाहून येणाºया भाविकांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी माहिती मिळावी, या दृष्टीने चारही बसस्थानकावर नकाशाद्वारे मार्गदर्शक सूचना दर्शविणारे फलक लावण्यात येणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीही दर्शनी भागावर असे मोठे फलक लावण्याचे नियोजन विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड आणि विभागीय वाहतूक अधिकारी विलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात येत असल्याचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक पी. आर. नकाते यांनी स्पष्ट केले.