सोलापूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे़ प्रशासनाने पंढरपुरात वारीपूर्वीच २८ दुकानांमधून मिठाई आणि खव्यांची तपासणी केली आहे़ तसेच उपवासातील भगर, शाबुदाणा आणि इतर अन्नपदार्थांचे नमुने घेतले असून, हे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहेत़
दरवर्षी आषाढ महिन्यातील वारीनिमित्त पंढरपुरात राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात़ यंदा २३ जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होत आहे़ या पार्श्वभूमीवर पंढरपुरात लाखो भाविक दाखल होतात आणि त्यांना लागणारे उपवासाचे पदार्थ, फळे पुरवठा करताना भेसळीचा प्रकार घडू शकतो़ भाविकांच्या जीवाशी खेळले जाऊ नये म्हणून प्रतिबंधित अन्नपदार्थसाठा शोधमोहीम यंदाही हाती घेण्यात आली आहे़ तसेच दुकानांचे परवानेही तपासले जात आहेत़ या पार्श्वभूमीवर बहुतांश दुकानांना परवानेदेखील अन्न व औषध प्रशासनाने वेळेत वितरित केले आहेत़
निर्भेळ खाद्यपदार्थांबाबत हॉटेल व्यावसायिकांना प्रशिक्षण - वारी काळात विषबाधा वा कोणताही अपायकारक प्रकार घडू नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने निर्भेळ, स्वच्छ, शुद्ध खाद्यपदार्थ पुरवण्याबाबत हॉटेल व्यावसायिकांना प्रबोधन आणि प्रशिक्षण दिले जात आहे़ यासाठी कोका-कोला या आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेतली जात आहे़ या कंपन्यांकडून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालखी मार्गावर दोन बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे़ अन्नपदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि पेयजल विक्रेत्यांना अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण देऊन त्यांना सुरक्षाविषयक साहित्य, प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रदेखील दिले जाणार आहे़
आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी समजली जाते़ बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात खवा आणि इतर पदार्थही येतात़ या वारी काळात वारकºयांच्या जीवाशी खेळले जाऊ शकते़ या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने पथके नेमली आहेत़ अनेक हॉटेल, दुकानांतील पदार्थ, पेढे आणि उपवासाचे पदार्थ यांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे़ सध्या काही हॉटेलवर धाडी टाकून प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्याचे काम सुरु आहे़बाहेर जिल्ह्यातून येणारा खवा, पेढ्यावर लक्ष आहे़ - प्रदीप राऊत, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन