प्रभू पुजारी
पंढरपूर : देशाची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपुरात आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होऊ लागले आहेत़ वारी सोहळा केवळ पाच-सहा दिवसांवर आला, तरीही शहरातील प्रमुख मार्गांवर अजूनही खड्डे असल्याचे दिसून येते. त्यामुळे सहज एक भाविक बोलून गेला ‘पंढरपूर नव्हे तर खड्डेपुरात भाविकांचे स्वागत!’ ही बोलकी प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खड्ड्यांकडे प्रशासनाचे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येते़
आषाढी वारीनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह अन्य संतांच्या पालख्या, दिंड्या आणि लाखो वारकरी रेल्वे, एस़ टी़ किंवा खासगी वाहनाने पंढरीच्या दिशेने येत आहेत़ काही भाविक पंढरीत दाखलही झाले आहेत़ संतांच्या पालख्यांचे मंगळवारी आणि बुधवारपासून जिल्ह्यात आगमन होणार आहे़ त्यामुळे या पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरपुरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुन्हा पालखी सोहळ्यात दाखल होत आहेत़
या पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीत आल्यानंतर त्यांना प्रथम येथील खड्ड्यांचे दर्शन होते़ शहरातील प्रमुख रेल्वेस्टेशन मार्गावर पद्मावती उद्यान ते डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक ते पुढे चौफाळापर्यंतच्या रस्त्यावर लहान-मोठे खड्डे आहेत़ ते अद्याप प्रशासनाने बुजविलेले नाहीत़ याच मार्गावरून मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या, अधिकाºयांच्या गाड्या शासकीय विश्रामगृहातून मंदिराकडे येतात़ तरीही या प्रमुख मार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बाहेरून आलेल्या भाविकांमधून ‘पंढरपूर नव्हे तर खड्डेपुरात भाविकांचे स्वागत!’ अशी बोलकी प्रतिक्रिया ऐकायला मिळाली़
याशिवाय पंढरपुरातील दुसरा प्रमुख मार्ग म्हणजे सरगम चौक ते इंदिरा गांधी चौक, भोसले चौक, पंढरपूर अर्बन बँकेपर्यंतचा रस्ता़ याच रस्त्यावरून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह अन्य संतांच्या पालख्या आणि दिंड्या आपापल्या मठाकडे व मंदिराकडे मार्गस्थ होतात़ मात्र या रस्त्यावरीलही खड्डे बुजविण्यात आलेले नाहीत़
नगरपरिषदेने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे़ पण ज्या रस्त्यावर पालखी सोहळे, दिंड्यातील वारकरी जातात त्याच रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ आषाढी वारीतील वारकºयांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात़ शहरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शौचालये यासाठी लाखो रुपयांचा निधी येतो़ मात्र तरीही प्रशासनाने शहरातील या प्रमुख दोन रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे़
वर्षानुवर्षे स्वागताला तो खड्डा...- सरगम चौक ते इंदिरा गांधी चौकादरम्यान रेल्वे पुलाखाली दोन्ही बाजूला खड्डे असतातच़ या ठिकाणचा खड्डा वर्षानुवर्षे भाविकांच्या स्वागताला असतोच़ प्रशासनातर्फे केवळ खडी व डांबर टाकून तो खड्डा बुजविला जातो़ सध्या पाऊस असून त्या पुलाखाली पाणी जमा होते़ त्यामुळे तेथून वाहने गेल्यानंतर खचून मोठा खड्डा पडतो़ त्यामुळे प्रशासनाने आता या ठिकाणी वारंवार खड्डा पडू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे, असे भाविकांनी सांगितले़
पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण केलेले आहे़ शिवाय अनेक मार्गावरील खड्डेही बुजविलेले आहेत़ प्रमुख मार्गावरील खड्डे जर बुजविण्याचे राहिलेले असतील तर तेही लवकरच बुजविण्यात येतील़ परंतु कोणत्याही स्थितीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची नगरपरिषद प्रशासन काळजी घेत आहे़- अभिजीत बापट, मुख्याधिकारी, नगरपरिषद पंढरपूऱ