गोपालकृष्ण मांडवकरमाळशिरस : पहिल्या वारीची आत्मानुभूती काय वर्णावी? ही अनुभूती आयुष्यभर आठवणीत राहणारी, संपूर्ण आयुष्याला नवी चेतना देणारी आणि आयुष्याच्या रहाटगाडग्यात चैतन्याची सरिता प्रवाहित करणारी!
वारीला आलेल्या लाखो भाविकांमध्ये अनेकांच्या वाºया मोजदादीच्या पलीकडे गेल्या आहेत. वारीचे हे कितवे वर्ष आहे, याची मोजदाद ठेवण्यापेक्षा वारी आली की अंगात चैतन्य संचारल्यासारखे वारीला निघणारे लाखो वारकरी यात सहभागी आहेत. असे असले तरी पहिल्या वारीच्या आठवणी सुखसागरातील लाटांसारख्या आजही वारकºयांच्या मनात उचंबळत आहेत.
‘लोकमत’ने काही वारकºयांना भेटून पहिल्या वारीच्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील चिकमहूद (ता. सांगोला) येथील शंकर बंडगर म्हणाले, पहिली वारी नक्की कोणत्या वर्षी केली होती, ते आठवत नाही; पण म्हातारीसोबत आलो होतो. तिचे बोट धरून फिरलो. वाटेवरून चाललो, बºयाच अडचणी आल्या होत्या. मुक्कामापासून ते जेवणापर्यंत अडचणी होत्या; पण पहिल्याच वारीने असा काही लळा लावला की, आतापर्यंत चुकलीच नाही.
तुकाराम जाधव यांचा अनुभव जरासा वेगळा आहे. चौदा वर्षांपूर्वी ते पहिल्यांदा वारीला आले. दिंडीसोबत राहून ती वारी करायची होती; पण दिंडीत कामच अधिक सांगितले जायचे. वारीच्या आनंदापेक्षा दिंडीतील कष्टामुळे मन खचले. कशीबशी वारी उरकली; पण त्यानंतर एकट्यानेच वारी करण्याचा निर्धार त्यांनी केला. गेली चौदा वर्षे आता ते सलग येतात.
विठुमाऊलीच्या सुखसागराचा आनंद घेतात.शिवाजी केरू रणदिवे हे साठ वर्षीय गृहस्थ मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून ते पायी वारी करीत आहेत. पहिल्या वारीला गळ्यात माळ घातली. ती आयुष्यभरासाठी. पहिल्या वारीचे सुख आजही ते शोधत आहेत. या वारीने आपल्या आयुष्यात गोडी आणल्याचे भक्तिभावाने सांगतात. मिरज तालुक्यातील मौजे दिग्रज या गावचे शिवाजी कोळी हे साठ वर्षीय गृहस्थ. त्यांची ही दुसरी वारी पहिल्या वारीने विठ्ठलभेटीची आस लागली. आता वारी तोडायची नाही, असा त्यांचा संकल्प आहे, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मुकुंद संभाजी फडतरे यांची ही पहिलीच वारी आहे. वारीच्या वाटेवर आनंदाला सीमाच नाही, असे ते म्हणतात. नांदेड जिल्ह्यातील सूरजचंद आडे (वय ६५) यांची ही पाचवी वारी आहे. तर नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूरचे नारायण कदम यांची ही आठवी वारी आहे. पहिल्या वारीच्या सुखाबद्दल वर्णन करताना ते गहिवरले. वारीला पायी चालण्याच्या सुखातच माऊली भेटीच्या आतुरतेचा आनंद ते अनुभवत आहेत.
आता वारी सोडू वाटत नाही!लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रल्हाद गणपत कोरके हे ६७ वर्षांचे गृहस्थ म्हणाले, एकदा तरी वारी अनुभवावी, असे ऐकले होते. आपली ही सहावी वारी आहे. मात्र वारीचे सुख इतके आहे की, आता वारी सोडू शकत नाही, अशी मनाची अवस्था झाली आहे.