सचिन कांबळे पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळ्यादरम्यान कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तत्काळ थांबवता यावा, यासाठी मंदिर व पोलीस प्रशासनाकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व शहरात एकूण १५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ हेच सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण आषाढी वारी सोहळ्यावर लक्ष ठेवणार आहेत़
आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी प्रमुख ९ पालख्यांसह शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. या दिंड्यांसह लाखो भाविक पायी वारी करीत पंढरपुरात येतात. त्याचबरोबर रेल्वे, एसटी व खासगी वाहनांनी येणाºया भाविकांची देखील संख्या जास्त आहे. यामुळे यात्रा कालावधीत शहरात १० ते १२ लाख भाविक येतात.
देशामध्ये कुठेही दहशतवादी कारवाई झाल्यास माहिती गुप्तचर विभागाकडून पंढरपूरला देखील हाय अलर्टचा संदेश दिला जातो. यामुळे बीडीडीएस पथक पंढरपूरला सतत तैनात असते़ यात्रा कालावधीत गर्दीच्यावेळी अशी कारवाई होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या बीडीडीएस पथकाद्वारे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची यात्रा कालावधीत तपासणी केली जाते.
तसेच मंदिर समितीच्या वतीने मंदिरात व मंदिर परिसरात १०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. याद्वारे मंदिर प्रशासन मंदिर परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवते. तसेच चंद्रभागा वाळवंट, महाद्वार, नामदेव पायरी, संत तुकाराम भवन, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, चौफाळा आदी परिसरातही सीसीटीव्ही आहेत़ विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेश करणाºया मुख्य दरवाज्यावर बॅग स्कॅनिंग मशीन बसवण्यात आली आहे. या मशीनद्वारे भाविकांच्या बॅगची तपासणी करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे.
या ठिकाणी असेल कॅमेºयाची नजरविठ्ठल-रुक्मिणी समितीतर्फे मंदिर परिसरात कायमस्वरूपी ८० व तात्पुरते २० कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ याचा नियंत्रण कक्ष मंदिरात आहे़ पत्राशेड दर्शनरांगेत २४ कॅमेरे बसविण्यात आले असून त्याचा नियंत्रण कक्ष तेथेच उभारला आहे़ शिवाय ६५ एकर परिसरात १६ सीसीटीव्ही बसविण्यात आले असून याच परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, शिवाजी चौक, चौफाळा, महाद्वार, पंढरपूर नगरपरिषद, भादुले चौक, नाथ चौक आदी चौकात भाविकांची जास्त गर्दी असते. यामुळे या ठिकाणी एकूण १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व कॅमेºयांचा नियंत्रण कक्ष पोलीस ठाण्यात आहे. यामुळे कोणतीही घटना घडल्यास पोलीस त्याठिकाणी तत्काळ पोहोचविण्यास अधिकाºयांना मदत होते.
मेटल डिटेक्टर व बॅग स्कॅनर मशीन- सुरक्षिततेच्या दृष्टीने विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनरांगेतील भाविकांची दर्शन मंडप व नामदेव पायरी येथे मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करून सोडण्यात येते. तसेच भाविकांच्या पिशव्या, पर्स, मोबाईल अशा वस्तूंची स्कॅनर मशीनद्वारे तपासणी करून दर्शनासाठी पाठविण्यात येते.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात घडणाºया हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ तसेच भाविकांच्या सेवेसाठी ज्या ठिकाणी अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे, त्या ठिकाणी ते योग्य प्रकारची सेवा बजावित आहेत की नाही हेही सीसीटीव्ही कॅमेºयामुळे समजणार आहे़ कामात कोण हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल़- सचिन ढोले,कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती.
आषाढी यात्रा सोहळ्यात आवश्यक पोलीस यंत्रणा आहेच, पण तरीही शहरात कोठे अनुचित प्रकार घडल्यास तेथील क्षणचित्रे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद होतील़ त्यामुळे त्वरित त्या ठिकाणी कारवाई करण्यास मदत होईल़ - श्रीधर पाडुळे,पोलीस निरीक्षक, पंढरपूर