आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : आषाढी वारीमध्ये धर्मादाय आयुक्त विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी फिरत्या रुग्णालयाची सोय केल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.बदलत्या काळानुसार धर्मादाय कार्यालयाने आॅनलाईन प्रणाली अवलंबली आहे. या उपक्रमांतर्गत संस्था नोंदणी, न्यास नोंदणी, न्यासाची हिशोबपत्रके ही कामे आॅनलाईन करणे शक्य झाले आहे. याची माहिती व्हावी यासाठी २४ जून २०१७ रोजी विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे ‘विश्वस्तांची कार्यशाळा आणि संगणकीकृत प्रशासनाची ओळख’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती पी. डी. नाईक उपस्थित राहणार आहेत. धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे हे विश्वस्तांना मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय पुणे विभागाचे धर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांचीही उपस्थिती असणार आहे. या उपक्रमाशिवाय आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात आलेल्या सर्व भाविकांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी सोलापूरच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने वैद्यकीय सेवा शिबीर आणि फिरत्या रुग्णालयाची सोय करण्यात आली आहे. हे शिबीर २७ जून ते ७ जुलै २०१७ या कालावधीत सुरू राहणार आहे. दोन्ही उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेस सहा. धर्मादाय आयुक्त माधव बोराळे, अमोलकुमार देशपांडे, रूपाली कोरे, निरीक्षक एम. व्ही. जावळे, एस. एस. कुमठेकर, आदेशिक वाहक बी. व्ही. दांडगे यांची उपस्थिती होती.
आषाढी वारीत फिरते रुग्णालय, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा उपक्रम
By admin | Published: June 23, 2017 2:16 PM