पंढरपूर : आळंदी-देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेगवेगळ्या ठिकाणी रिंगण सोहळे असतात; मात्र वाखरी (ता. पंढरपूर) येथील बाजीराव विहीर या एकमेव ठिकाणी या दोन्ही पालख्यांचे होणारे सर्वात मोठे रिंगण सोहळे यावर्षी होणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून प्रत्येकवर्षी होणारी स्वच्छता, साफसफाई यावर्षी झालीच नाही. म्हणून या रिंगण स्थळावर सध्या काटेरी झाडे-झुड३;पे, ठिकठिकाणी वाढलेले गवत, रस्ता दुरूस्तीसाठी काढून टाकलेल्या झाडांचे बुंदे दिसत आहेत. तरीही काही भाविक ऐतिहासिक रिंगण स्थळाला जाऊन भेटी देत आहेत. त्यामुळे सध्या हे रिंगणस्थळ शेळ्या-मेंढ्यांचे चरण्याचे कुरण बनले असल्याचे दिसत आहे.
यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रा सोहळा रद्द झाला आहे. त्यामुळे आळंदी-देहूहून पंढरपूरला पायी चालत येणारे पालखी सोहळेही रद्द झाले आहेत; मात्र प्रशासनाकडून परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून मोजक्याच वारकºयांसह संतांच्या पादुका वाहनांद्वारे पंढरपूरला आणण्याचे नियोजन केले आहे; मात्र पालखी मार्गावरील मान-पान, रिंगण सोहळे, मुक्काम, विसाव्याच्या ठिकाणी सध्या शांतता पसरली आहे. यात्रा सोहळा कालावधीत या सर्व ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन, अभंग सर्वधर्मातील लाखो वैष्णवांच्या मेळ्याने गजबजलेले असते; मात्र यावर्षी हे चित्र वेगळे असून सर्वसामान्य वारकºयांना व्यथित करणारे आहे.
श्रीसंत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज हे दोन्ही पालखी सोहळे तोंडले-बोंडले येथे एकत्र येतात. या पालख्या पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथून एकत्र पुढे चालत येतात. तेथून पुढे दोघांचे मुक्काम वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या गावात असतात; मात्र दुसºया दिवशी पंढरपूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाºया बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) या ऐतिहासिक ठिकाणी दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे एकाच ठिकाणी भरतात.
संत तुकाराम महाराज पालखीचा गोल रिंगण सोहळा तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुख्य पालखी मार्गावर उभा रिंगण सोहळा असतो. या दोन्ही पालख्यातील रिंगण सोहळे एकाच ठिकाणी पाहावयास मिळतात. पालख्यांचे दर्शनही एकाच ठिकाणी होते. म्हणून संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील लाखो भाविक शिवाय सोलापूर जिल्ह्यातून जमा झालेले भाविक यामुळे हा रिंगण सोहळा पालखी मार्गावरील सर्वात मोठा रिंगण सोहळा म्हणून परिचित आहे. या सोहळ्यासाठी किमान ७ लाखांपेक्षा जास्त भाविक प्रत्येकवर्षी उपस्थित असतात. मात्र यावर्षी मागील कित्येक वर्षांची भक्तीमय परंपरा खंडित होणार आहे. हे दोन्ही सर्वात मोठे रिंगण सोहळे रद्द झाल्याने वारकरी, भाविक व्यथित झाले आहेत. असे असले तरी वाखरी येथील काही बालगोपाळ आज रिंगण स्थळावर भजन, कीर्तन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रिंगण स्थळावर स्वच्छतेचा अभाववाखरी-बाजीराव विहीर रिंगण स्थळावर दोन प्रमुख पालख्यांचे दोन सर्वात मोठे रिंगण सोहळे भरतात. हा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी पालख्यांतील वारकºयांसह सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविक त्याठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे प्रशासनाकडून प्रत्येकवर्षी काटेरी झुडपे, गवत काढणे, ट्रॅक्टर सहाय्याने रिंगण स्थळ सपाटीकरण करणे, पाऊस आल्यास भाविक, अश्वांना त्रास होऊ नये यासाठी मुरमीकरण करणे आदी महत्त्वाची कामे त्याठिकाणी केली जातात. मात्र यावर्षी रिंगण सोहळा होणार नसल्याने प्रशासनाकडूनही याकडे फारसे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. म्हणून रिंगण स्थळावर ठिकठिकाणी काटेरी झुडपे, गवत आदी साम्राज्य पसरल्याने स्वच्छतेचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.
एकत्र दोन्ही रिंगण सोहळे पाहण्याची संधी हुकलीपालखी मार्गावरील दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे पाहण्यासाठी त्या त्या ठिकाणचे पालखीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात; मात्र अख्ख्या पालखी मार्गावर श्रीसंत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज या प्रमुख पालख्यांचे रिंगण सोहळे एकत्र होण्याचे एकमेव ठिकाण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) हे आहे. त्यामुळे हे रिंगण सोहळे पाहण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती असते; मात्र यावर्षी दोन्ही सोहळे होणार नसल्याने हा क्षण टिपण्याची संधी हुकली आहे.